बदनापूर (जालना) - बदनापूर पोलीस ठाण्याची इमारत निजामकालीन असल्याने ही इमारत अतिशय जीर्ण झाली आहे. इमारतीला भेगा पडल्या आहेत. पावसाळ्यात इमारतीमध्ये पाणी शिरते, त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरवेळेस केवळ तात्पुरती दुरुस्ती करण्यात येते. 92 गावांच्या सुरक्षेची जबाबदारी बदनापूर पोलीस ठाण्यावर आहे, त्यामुळे या इमारतीची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे.
निजामकालीन जुनी इमारत
बदनापूर पोलीस ठाण्याची निर्मिती निजामकाळात झालेली असून, या ठाण्याची इमारत जीर्ण अवस्थेत असल्याने छतावर पावसाळ्यात प्लास्टिक टाकावे लागते. पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गावांची संख्या आणि कामाचा व्याप वाढला असतानाही पोलीस ठाण्यात सुविधा नाहीत. ठाण्याच्या पडवीत बसून अधिकाऱ्यांना कामे करावी लागतात. पोलिसांसह अंमलदारांना देखील एकाच खोलीत बसून काम करावे लागते. मुळात या पोलीस ठाण्याला 10 ते 15 खोल्यांची गरज आहे. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानाची देखील सोय करण्यात आलेली नाही. बदनापूर पोलीस ठाण्यावर तालुक्यातील 92 गावांची जबाबदारी आहे, त्यामुळे तक्रारी देण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असते, अशा परिस्थितीत इमारतीत बसण्याची सोय नसल्यामुळे नागरिकांना झाडाखाली बसावे लागते.
जिल्हा निर्मितीनंतर नवीन इमारत नाही
जालना जिल्ह्याची निर्मिती 1981 मध्ये झाली. जिल्ह्याच्या निर्मितीनंतर पोलीस ठाण्याच्या इमारतीचा विकास होईल, अशी अपेक्षा होती. मात्र लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे अद्यापही इमारतीचे काम झाले नाही. कामाची जबाबदारी पाहता या पोलीस ठाण्यात 50 पोलिसांची आवश्यकता आहे. मात्र सध्या इथे केवळ 20 कर्मचारी कार्यरत आहेत. 1992 साली बदनापूरला तालुक्याचा दर्जा मिळाला, मात्र तेव्हा देखील या इमारतीची दुरुस्ती करण्यात आली नाही. या इमारतील चारही बाजुने भेगा पडल्या आहेत, यामुळे पावसाळ्यात पाणी इमारतीमध्ये शिरत असल्यामुळे प्रचंड त्रास होत आहे.