बदनापूर (जालना) - तालुक्याचे ठिकाण असून देखील मागील अनेक वर्षांपासून बदनापूर येथे बसस्थानक नसल्यामुळे, प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. बसस्थानकासाठी जागा उपलब्ध होत नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. उन्हापावसात बसची वाट पहात प्रवाशांना रस्त्यावर थांबावे लागत आहे. त्यामुळे शहरात बसस्थानकाची निर्मिती करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
बसस्थानक नसल्यामुळे प्रवाशांचे हाल
बदनापूर हे शहर जालना-औरंगाबाद मुख्य रस्त्यावर असून, तालुक्याचे ठिकाण आहे. त्यामुळे आजूबाजूच्या खेड्या-पाड्यांसह मोठ्या संख्येने या ठिकाणावरून प्रवासी वाहतूक होते. मात्र बदनापूरमध्ये बसस्थानक नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होतात. प्रवाशांना उन्हापावसात बसची वाट पाहत रस्त्यावरच थांबावे लागत आहे. बऱ्याचवेळा रस्त्यावर प्रचंड वाहतूक असल्यामुळे अनेक गाड्या बदनापूरमध्ये न थांबताच निघून जातात.
स्वच्छतागृह नसल्याने प्रवाशांची कुचंबणा
बदनापूरच्या आजूबाजूच्या खेड्या-पाड्यांसह शहरातूनही मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होते. प्रवाशांना रस्त्यावर उभे राहून बसची वाट पाहावी लागते. बसस्थानक नसल्यामुळे येथे स्वच्छतागृह देखील नाही. स्वच्छतागृह नसल्याने प्रवाशांची कुचंबणा होते आहे.
लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष
बदनापूरमध्ये बसस्थानक नसल्यामुळे जलद गाड्या व लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करण्यासाठी अडचण येते. बदनापूर बसस्थानकाचा प्रश्न तातडीने सोडवावा अशी मागणी नागरिक करत आहेत. त्यासाठी आंदोलने देखील करण्यात आली, मात्र अद्यापही हा प्रश्न सुटलेला नाही.
आंदोलनानंतरही बसस्थानकाला मुहूर्त मिळेना
बदनापूर शहराला तालुक्याचा दर्जा प्राप्त होऊन ३० वर्ष उलटली आहेत, दरम्यान या तालुक्याच्या ठिकाणी परिवहन महामंडळाच्या जलद, अतिजलद बसेस थांबत नसल्याने १९९९ मध्ये नागरिकांनी आंदोलन केले हेते. त्यानंतर परिवहन महामंडळाकडून बदनापूरमध्ये बसथांबा मंजूर करण्यात आला. त्यानंतर काही दिवस या ठिकाणी प्रत्येक बस थांबत होती. मात्र त्यानंतर काही दिवसांनी इथे बस थांबायच्या बंद झाल्यात. परिवहन महामंडळाच्या बस इथे थांबत नसल्यामुळे, नागरिकांना अनेकवेळा खासगी वाहनातून प्रवास करावा लागतो. याबाबत अनेकवेळा निवेदने देण्यात आली आहेत, मात्र अद्यापही यांची नोंद घेण्यात आलेली नाही.
तालुका व मोठी प्रवासी संख्या असूनही शिवशाही थांबेना
तालुका असून देखील बसस्थानक व आगार नसल्याने प्रवाशांना रस्त्यावर बसची वाट बघत थांबावे लागते. बऱ्याचवेळेस बस न थांबता निघून जात असल्याने खासगी वाहनातून प्रवास करावा लागतो. सध्या परिवहन महामंडळाने शिवशाही बस सुरू केली आहे, पण त्याला देखील थांबा देण्यात आलेला नाही. बसस्थानकाचा प्रश्न तातडीने निकाली काढावा, तसेच शहरात प्रत्येक बसला थांबा देण्यात यावा, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.