जालना - बदनापूर तालुक्यातील मानदेऊळगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने आमदार कुचे आणि त्यांचा भाचा दीपक डोंगरे हे आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले.
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ
निवडणुकीच्या तोंडावरच आमदार नारायण कुचे यांचा भाचा दीपक डोंगरे यांना जालना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते . मात्र या हद्दपारीला दीपक डोंगरे यांनी आयुक्तांकडून स्थगिती मिळवून ग्रामपंचायत निवडणूक लढवली. त्यामुळे या मामा- भाचाच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष होते. कारण दीपक डोंगरे यांनी नारायण कुचे यांच्या सांगण्यावरून आपल्याला पोलिसांनी हद्दपार केल्याचा आरोप केला होता. त्यांनी नारायण कुचे यांच्या पॅनलच्या विरोधात आपले पॅनल उभे केले. त्यामुळे हि निवडणूक चांगलीच चर्चेत आली. दरम्यान मानदेऊळगावमध्ये नारायण कुचे यांचे पॅनल, दीपक डोंगरे यांचे पॅनल आणि पंचायत समिती सदस्य अरुण डोळसे यांचे पॅनल उभे होते. यामध्ये अरुण डोळसे यांच्या पॅनेलला तीन, आमदार कुचे यांच्या पॅनलला एक तर दीपक डोंगरे यांच्या पॅनलला 2 जागांवर विजय मिळाला. मात्र स्वतः दीपक डोंगरे यांचा या निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.