बदनापूर (जालना) - तालुक्यात यंदा पावसाने ‘बरसात’ केलेली असून सर्वत्र पाणीच पाणी केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा खरिप हंगाम मात्र वाहून जात असून गेल्या आठ ते पंधरा दिवस झालेल्या संततधार पावसाने खरिपातील कापूस, तूर, मूग, उडीद, हायब्रीड ज्वारी, मका, सोयाबीन, बाजरी या पिकांबरोबरच तालुक्यातील नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे भाजीपाला पिकाचेही नुकसान होत असल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहे.
बदनापूर तालुक्यात मागील पाच ते सहा वर्षांपासून मान्सून वेळेवर न पडल्यामुळे दुष्काळी परिस्थिती होती. तरीही तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध ठिकाणी शेततळी तर कुठे नाला खोलीकरण, बंधारे टाकून पाणी साठवून सिंचनाच्या सोयी करून निसर्गाला आवाहन देत शेती जगवली. तरीही कोरडवाहू शेतकऱ्यांच्या उत्पादनात प्रचंड घट या पाच ते सहा वर्षात झाली.
बदनापूर तालुक्यातील शेतकरी दुष्काळामुळे आधीच मेटाकुटीला आलेला असताना, यंदा तरी नियमित पाऊस होऊन उत्पादन होईल, या आशेवर खरिपाची मेहनत करून पेर केली. मात्र जून महिन्याच्या दुसऱ्या आठवडयापासून पावसाने मोठया प्रमाणात बरसात केलेली असून तालुक्यातील अनेक मंडळात तर अतिवृष्टी झाल्यामुळे कित्येक शेतकऱ्यांना दुबार पेरणी केल्यानंतरही शेतीत पाणी तुंबल्यामुळे खरिप पिकांची प्रचंड नासाडी झाली होती. त्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवडयापासून पावसाने जोरदार हजेरी लावलेली असून मागील आठ दिवसांपासून दररोज पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळे खरिपाचे व शेतकऱ्यांना पोळयापूर्वी उत्पादन मिळवून देणारे मूग व उडिद या पिकांचे प्रचंड नासाडी झालेली आहे.
काही शेंगा वाळलेल्या असल्यामुळे सततच्या पावसाने उडीद व मूगाच्या शेंगा पाण्यात भिजून त्यांना चक्क कोंब फुटू लागले आहे. खरिप हंगामातील सोयाबीन, मका व कापूस पिके सध्या जरी चांगले दिसत असले तरी सततच्या पावसामुळे प्रचंड गवत या पिकांमध्ये झाल्यामुळे शेतकऱ्यांपुढील काळजी वाढली असल्याचे चित्र असून शेतकरी आता लवकर पाऊस उघडला तर मशागतीला वेग देऊन उरले सुरले पिके वाचवू अशी प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन घेतले जाते. पावसाने त्याचे ही नुकसान झाले आहे. जास्त पावसाने मुगाच्या शेंगाला कोंब येत आहे.