जालना - महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला. मात्र, या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने आता शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांमध्ये नाराजी नाट्याला सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आमदार कैलास गोरंट्याल यांनी देखील नाराजी नाट्यात सहभागी होत राजीनामा अस्त्र उपसले आहे. गोरट्यांल यांच्यासह जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याला मंत्री मिळालेच पाहिजे अशी भूमिका घेत राजीनामे सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात आयोजित महेश भवनमध्ये मेळाव्यात त्यांनी हा निर्णय घेतला.
गोरंट्याल म्हणाले, जिल्ह्यामध्ये बुडत असलेल्या काँग्रेसला जीवंत ठेवण्यासाठी आपण रक्ताचे पाणी केले. भाजपकडून आणि राष्ट्रवादीकडून आपल्याला बोलावण्यात आले होते. मात्र, आपण काँग्रेससोबत एकनिष्ठ राहिलो. मोदी लाटेमध्ये देखील जिल्ह्यातील तीन नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात ठेवल्या आहेत. त्याचप्रमाणे अनेक संस्थाही काँग्रेसच्या ताब्यात ठेवण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत. मात्र घराणेशाहीमुळे काँग्रेसमध्ये माणसांची किंमत राहिली नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. चार वेळा पक्ष सोडून गेलेल्या माणसाला पुन्हा पक्षात घेऊन मंत्रिपद बहाल केले जात आहे. याला समतोल म्हणायचा का? असा सवालही गोरंट्याल यांनी उपस्थित केला.
काँग्रेसच्या या पक्षपाती धोरणामुळे जालना जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले आहेत. त्यामुळे माझ्यासह सर्वच नगरपालिकेच्या नगराध्यक्ष नगरसेवक आणि काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांनी फक्त पदाचा नव्हे तर काँग्रेसच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा देण्याचे ठरविले आहे. हा निर्णय आज शनिवारी सर्व कार्यकर्त्यांच्या समक्ष घेण्यात आला आहे. त्यामुळे आता माघार नाही असा पवित्रा आमदार गोरंट्याल यांच्यासह कार्यकर्त्यांनी घेतला आहे. यावेळी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश जेथलिया, राजेंद्र राख शेख महंमद, प्रभाकर पवार, सुषमा पानगव्हाणे, शितल तनपुरे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.