जालना - शिवसेनेचे माजी राज्यमंत्री आणि जालन्यातील शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त जालना शहरात शिवसैनिकांनी 'भावी खासदार' असा उल्लेख केलेले खोतकरांचे बॅनर लावले आहेत. त्यामुळे, अर्जुन खोतकर हे रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खोतकरांच्या या बॅनरबाजीवर काँग्रेस आमदार कैलास गोरंटयाल ( Congress MLA Gorantyal criticize Arjun Khotkar ) यांनी हल्ला चढवला आहे.
विधानसभा निवडणुकीपासून अर्जुन खोतकर आणि रेल्वे राज्यमंत्री आणि जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांच्यात विस्तव देखील जात नाही. खोतकरांच्या या बॅनरबाजीवर काँग्रेस आमदार कैलास गोरंटयाल यांनी हल्ला चढवला आहे. जे २५ वर्षे राजकारणात राहिले आणि २५ वर्षांपैकी ज्यांनी १० वर्षे मंत्री राहून एकही विकासाचे काम केलेले नाही त्यांनी स्वतःला भावी खासदार म्हणून घेऊ नये. खासदार होण्याचे स्वप्नही पाहू नये. ज्यांची ग्रामपंचायतमध्ये निवडून येण्याची लायकी नाही त्यांनी खासदारकीचे स्वप्न पाहू नये, अशा शब्दात गोरंटयाल यांनी खोतकरांची खिल्ली उडवली आहे.
त्यांनी स्वतःला भावी खासदार म्हणून घेतले नाही तर, कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागे राहणार नाही, अशी खोतकरांची खिल्लीही गोरंटयाल यांनी उडवली. अर्जुन खोतकर यांच्या विरोधात सध्या भाजप, काँग्रेस एकवटल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी केली होती. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी तलवार मॅन केली होती. त्यामुळे, २०२४ ची लोकसभा निवडणूक अर्जुन खोतकर लढणार का? अशी चर्चा सध्या जिल्ह्यात ऐकायला मिळत आहे.