जालना - काल सकाळी चोरीला गेलेली बियाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तत्परता दाखवत पकडले. हे बियाणे २२ लाख रुपये किंमतीचे असल्याचा दावा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी प्रसिद्धी पत्राकात केला आहे. मात्र, तक्रारकर्त्याने तीन लाखांचा माल चोरीला गेल्याचे सांगितले असताना 22 लाख रुपयांचे बियाणे आले कुठून? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
..अशी आहे तक्रार
जुन्या जालन्यातील इन्कम टॅक्स कॉलनी भागात राहणाऱ्या स्वामी अपार्टमेंटमधील ओमकार कृष्णा यादव (वय 23) यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीत म्हंटले आहे की, काल मध्यरात्री 1.30 ते सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान स्वामी अपार्टमेंटमधून 1 टन कांदा बियाणे भरलेला छोटा हत्ती चोरीस गेला आहे. यामध्ये तीन लाख रुपयांचे सुमारे एक टन कांदा बियाणे आहे, तर दीड लाख रुपयांचा एम.एच.21.एक्स 8347 हा टाटा कंपनीचा छोटा हत्ती हे वाहन आहे. असा एकूण साडे चार लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला असल्याची तक्रार कदीम जालना पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तत्परता दाखवत सराईत गुन्हेगार तपासले. दरम्यान नवीन जालना भागात अंबर हॉटेलजवळ चोरीला गेलेला छोटा हत्ती उभा असल्याचे दिसले. यावरून तपास करत त्यांनी सराईत गुन्हेगार सागरसिंग फंटासिंग उर्फ सुरजसिंग अंधेरीले (रा. गुरू गोविंद नगर, शिकलकरी मोहल्ला) याला ताब्यात घेतले आणि विचारपूस केली.
हेही वाचा - जालन्यातील रस्त्यांवर अवतरले यमराज; करतायेत कोरोना नियमांची जनजागृती
सागरसिंग याने गुन्हा केला असल्याची कबुली दिली. परंतु, अंबर हॉटेल जवळ उभा असलेला छोटा हत्ती रिकामाच होता. त्यामुळे, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सागरसिंगला पोलिसी खाक्या दाखवला, त्यानंतर त्याने जुना जालना भागातील स्वर्ग हॉटेलसमोर असलेल्या जुन्या पडीक रेल्वेच्या निवासस्थानाच्या बाजूला काढून टाकलेला माल पोलिसांच्या स्वाधीन केला. अशाप्रकारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी फिर्यादीने तक्रारीमध्ये दिलेले दोन्ही मुद्देमाल जप्त केले आहेत, आणि आरोपीलाही ताब्यात घेतले आहे.
19 लाख रुपयांचे बियाणे आले कुठून?
तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये तीन लाख रुपयांचे बियाणे चोरीला गेले असल्याचे म्हंटले आहे आणि बाजारात देखील या कांदा बियाण्यांची सरासरी किंमत एक क्विंटलला 50 हजार रुपये एवढी आहे. त्यानुसार एक टन बियाण्याची किंमत सरासरी पाच लाख व्हायला हवी. त्यानुसार तक्रारकर्त्याने देखील तीन लाखांचे बियाणे म्हटले आहे. परंतु, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हे बियाणे 22 लाख रुपये किंमतीचे असल्याचा दावा प्रसिद्धी पत्रकात केला आहे. त्यामुळे, तक्रारकर्ता आणि पोलीस या दोघांच्या तफावतीमध्ये असलेल्या 19 लाख रुपये बियाण्यांचे गौडबंगाल काय? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
हा आहे गोंधळ
फळ पिकाचे बियाणे उत्पादन करणाऱ्या कलश सीड्सने मेहकर येथील एका शेतकऱ्याला कांदा पुरवून त्याच्यापासून निघणारे कांदा बियाणे उत्पादित करण्यास सांगितले होते. त्यानुसार गुरुवारी रात्री मेहकर येथून नऊ वाजता हा छोटा हत्ती 1033 किलो कांदा बियाणे घेऊन जालन्याकडे निघाला. दरम्यान, मेहकर ते जालना हे तीन तासाचे अंतर लक्षात घेता हा टेम्पो बारा वाजेच्या सुमारास मंठा चौफुली भागात असलेल्या कलश सीड्सच्या आवारात उभा असणे अपेक्षित होते. मात्र, चालकाने हा टेम्पो सरळ आपल्या घरी नेऊन उभा केला आणि तो चोरीला गेला. त्यामुळे, या चालकाला या बियाण्यांची किंमत माहिती नव्हती. मात्र, हे उत्पादित केलेले बियाणे आहे आणि त्यावर प्रक्रिया करणे बाकी असल्यामुळे असे बियाणे बाजारामध्ये सुमारे 50 हजार रुपये प्रति क्विंटल भावाने मिळू शकते. परंतु, या बियाण्यांची प्रतवारी, वर्गवारी आणि प्रक्रिया केल्यानंतर हेच बियाणे बाजारामध्ये सरासरी दोन हजार रुपये किलो प्रमाणे कंपनी विकते. त्यानुसार या बियाण्यांची किंमत सुमारे 22 लाख 50 हजार रुपये एवढी होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कंपनी विक्रीची किंमत ग्राह्य धरलेली आहे. दरम्यान संबंधित बियाणे घेऊन आलेले वाहन निर्धारित वेळेत कंपनी पर्यंत पोहोचले नाही म्हणून कलश सीड्सच्या वतीने देखील कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, संबंधित वाहनचालकाने अगोदरच तक्रार दिलेली असल्याचे कलश सीड्सला कळविण्यात आले आहे.
दरम्यान, ही कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, शिवाजी नागवे, नवल कांबळे, गोकुळसिंग कायटे, सचिन चौधरी, प्रशांत देशमुख आदींनी ही कारवाई केली.
हेही वाचा - जालन्यात दारु खरेदीसाठी तुफान गर्दी