जालना - वरिष्ठांची परवानगी न घेता पोलीस प्रशासनाने स्थापन केलेले दरोडा प्रतिबंधक पथक 24 तासात बरखास्त करा. तसेच आवश्यकता असल्यास या पथकाचे कामकाज स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाच्या अंतर्गत चालवावे, असे आदेश औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी दिले आहेत.
हेही वाचा... अल्पवयीन मुलीच्या लग्नात पोहोचले पोलीस; कराडच्या निर्भया पथकाने रोखला बालविवाह
औरंगाबाद परिक्षेत्रातील जालना व बीड येथे पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली दरोडा प्रतिबंधक पथक कार्यरत आहे. हे पथक कोणत्या आदेशान्वये स्थापित झाले, याचा बोध होत नाही. या पथकाच्या कामकाजासंदर्भात अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे या पथकाचे कामकाज समाधानकारक नसल्याचे दिसते. म्हणून हे दरोडा प्रतिबंधक पथक चोवीस तासाच्या आत बरखास्त करावे, असे 2 मार्च रोजी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात शहरातील गोरखनाथ वलेकर, या तरुणाने दरोडा प्रतिबंधक पथकाने आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याची तक्रार डॉ. रवींद्र सिंगल यांच्याकडे केली होती. यासाठी त्यांनी योग्य पुरावे देखील सादर केले होते. या तक्रारीची दखल घेत डॉ. सिंगल यांनी एक विशेष पथक पाठवून जालन्यात दिवसभर या प्रकरणाची चौकशी करून घेतली. या चौकशीमध्ये दरोडा प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास शेळके यांच्यासह ज्ञानदेव नागरे, गणेश जाधव, रमेश काळे, कृष्णा चव्हाण यांच्यासह अन्य तेरा जणांची चौकशी सुरु केली. या चौकशीनंतर तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे प्रथमदर्शनी डॉ. सिंगल यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दिनांक २ मार्च रोजी हा आदेश काढला.