बदनापूर (जालना) - कोरोना रोगाच्या निवारणार्थ करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात शासकीय बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी तिघांनी बैठकीत घुसून शासकीय कार्यालयाची तोडफोड केली. बदनापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना शिवीगाळ केली. तसेच मुख्य अभियंत्याला मारहाण केली.
बदनापूर नगर पंचायत हद्दीत पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. या पार्श्वभूमीवर नगर पंचायतकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनेसाठी 1 जूनला सायंकाळी चार वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे, अभियंता गणेश ठुबे, भारत लक्ष्मण पवार, रशिद दिलावर पठाण, विजय पाखरे, मिलिंद दाभाडे, सुशीला कांबळै, कमल कांबळे, संदीप साबळे, तेजराव दाभाडे आदी उपस्थित होते. बैठक सुरू असतानाच या ठिकाणी राहुल निरंजन चाबुकस्वार, पूजा राहुल चाबुकस्वार, शिलाबाई निरंजन चाबूकस्वार हे मास्क अथवा रुमाल परिधान न करता या बैठकीत शिरले.
यावेळी त्यांनी बदनापूर येथील गट क्रमांक 189मधील जमिनीत पाय का ठेवला? असे विचारत राहुल चाबुकस्वार याने मुख्याधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. तसे मारहाण करण्याकरिता धावून गेला. तसेच पूजा चाबूकस्वार हिने अभियंता गणेश ठुबे यांना मारहाण केली. त्यांनी तेथील मालमत्तेची देखील नासधुस केली. तसेच टेबलावर असलेल्या फाईल फेकून शासकीय कामात अडथळा आणला. आमच्याविरुद्ध पोलिसांत कुणी तक्रार केली तर, त्याला पाहून घेऊ सर्वांना जीवे मारून टाकू, अशा धमक्याही त्यांनी दिल्या. याबाबत बदनापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.