जालना - व्यापारी महिलेच्या नावावर खोटे कर्ज दाखवून तिची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आयडीबीआय बँकेच्या व्यवस्थापकासह एक वकील आणि अन्य तिघांवर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर बाजार पोलीस ठाण्यात कलम 420 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुन्या जालना परिसरात 1993 मध्ये विजया गोविंदराव भाले या महिलेने आशापूरक क्लॉथ सेंटर या नावाने कापड दुकान सुरू केले होते. डॉक्टर वसंत चौगुले यांच्या मालकीचे ही जागा होती आणि ती जागा भाले यांनी भाडेतत्त्वावर घेतली होती. काही दिवसांनी चौगुले यांनी ही जागा सोडण्यासाठी भाले यांच्याकडे तगादा लावला, परंतु दुकान चांगले चालत असल्यामुळे भाले यांनी भाडे वाढवून घ्या, मात्र दुकान रिकामे करू नका अशी विनंती करत दुकान सोडण्यास नकार दिला. त्यानंतर चौगुले यांनी 2005 मध्ये भाले यांच्याविरुद्ध न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला आणि त्याचा निकाल भाले यांच्या विरोधात गेला. त्यानंतर भाले यांनी पुन्हा या निकालाचे विरुद्ध उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे अपील दाखल केले. ज्या अपिलाचा निकाल अद्याप बाकी आहे. मात्र तूर्तास हे दुकान श्रीमती विजया भाले यांच्या ताब्यात आहे.
दुकानात कापड खरेदीसाठी भाले यांनी पूर्वीच्या युनायटेड वेस्टर्न बँकेचे 60 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते आणि ते परतफेडही केले होते. दरम्यानच्या काळात या दुकानाचे मालक डॉक्टर वसंत चौगुले त्यांचे जावई महेश साकळगावकर आणि मुलगी वैशाली साकळगावकर यांनी भाले यांना वारंवार भेटून मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामध्ये ते यशस्वी झाले नाहीत. त्यामुळे डॉक्टर चौगुले आणि साकळगावकर दाम्पत्याने वकिलाच्या मदतीने भाले यांच्या खोट्या सह्या वापरून पुन्हा हे कर्ज वाढवून 2 लाख 56 हजार 437 रुपये घेतले. मात्र, ते परतफेड न केल्यामुळे बँकेने न्यायालयात दावा दाखल केला आहे. या न्यायालयाची नोटीस भाले यांना मिळाल्यानंतर त्यांनी या सर्व प्रकरणाचा छडा लावला.
कर्ज प्रकरणावरील तिकीटावरून लागला छडा-
भाले यांनी बँकेमध्ये सादर केलेल्या कागदपत्रांची माहिती घेतली असता, या कर्ज प्रकरणावर चिकटवलेले तिकीट हे 2005 नंतर सुरू झालेले आहे आणि कर्ज प्रकरण हे 2003 चे आहे. त्यामुळे जे तिकीट अस्तित्वातच नव्हते ते या कर्ज प्रकरणावर कसे? असा प्रश्न उपस्थित करून हे सर्व प्रकरण बनावट आणि खोट्या सह्या करून तयार केले असल्याचे भाले यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या कागदपत्रावरून दिसून येते. या सर्व माहिती व पुराव्याच्या आधारे सदर बाजार पोलिसांनी विजया भाले(राहणार भाग्यनगर) तक्रार दाखल केली. यामध्ये जागेचे मालक डॉक्टर वसंत चौगुले त्यांचे जावई महेश साळगावकर, मुलगी वैशाली साळगावकर, वकील रत्नाकर देशमुख आणि आयडीबीआय बँकेचे तत्कालीन मॅनेजर धनराज मानकर या पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.