जालना - भोकरदन-जालना महामार्गावरील बरंजळा पाटीजवळ कार व दुचाकीची समोरासमोर टक्कर होवून मोठा अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये शिक्षक संदीप उत्तमराव उबाळे (वय.35, रा. मौंढाळा, ता.जि. बुलढाणा) यांचा मृत्यू झाला .
शिक्षक उबाळे हे भोकरदन तालुक्यातील जानेफळ मिसाळ येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. ते आपले काम झाल्यानंतर दुचाकीवरून भोकरदनकडे येत असतांना सायंकाळच्या सुमारास बरंजळा पाटी जवळ मारुती अल्टो क्र. एम.एच.28 8570 ही गाडी जालन्या कडे जात असतांना व दुचाकी (क्र. एम एच 28 बी. ई. 2309) दुचाकी यांची समोरासमोर जोराची टक्कर झाली. या अपघातात दुचाकीस्वार शिक्षक उबाळे यांचा मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी व नागरिकांनी घटनास्थळी दाखल होऊन शिक्षक उबळे यांना भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. डॉ.एस.एस मेहेत्रे यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषीत केले. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात असल्याचे डॉ. मेहेत्रे यांनी सांगितले आहे. उबाळे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर पार्थिवावर शनिवारी सकाळी मौंढाळा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दरम्यान, भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात शिक्षकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांच्या अचानक झालेल्या अपघाती मृत्यूमुळे शिक्षक बांधव व नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.