जालना - रस्ते तयार करणाऱ्या आयआरबी कंपनीच्या गलथानपणामुळे एका वासराचा जीव धोक्यात आला होता. मात्र, शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही जीवित हानी टळली. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग जालना जिल्ह्यातून जातो. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथून जाणाऱ्या या महामार्गाच्या बाजूला मोठे नाले तयार करण्यात आले आहेत. मात्र, या नाल्यांवर झाकण टाकलेले नसल्यामुळे जीवित हानी होण्याची शक्यता आहे.
परिसरातील शेतकरी अशोक पालकर यांच्या गाईचे वासरू रविवारी या नाल्यामध्ये पडले. आतमध्ये पडलेल्या या वासराला स्वत: नाल्याच्या बाहेर निघता आले नाही. या वासराला बाहेर काढायचे कसे? हा प्रश्न शेतकर्यांसमोर होता. सुरुवातीला त्याला हिरवा चारा टाकून त्याला जवळ बोलावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी झाल्याने शेवटी शेतकऱ्यालाच नाल्यात उतरावे लागले. दोन तासाच्या प्रयत्नानंतर या वासराला वाचवण्यात यश आले.
माणसे आणि जनावरांचा जीव धोक्यात -
वडीगोद्री परिसरात ओलिताची भरपूर शेती आहे. त्यामुळे उसासारख्या बागायती पिकांचे प्रमाणी जास्त आहे. परिणामी यापरिसरात रानडुकरे, ससे, कोल्हे आदी प्रकारच्या प्राण्याचा वावर आहे. झाकण नसलेल्या नाल्यांमुळे या प्राण्यांच्या जीवाला धोका आहे. तसेच रात्री-अपरात्री शेताकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांचेही अपघात होण्याची शक्यता आहे. आयआरबी कंपनीच्या गलथान कारभाराबद्दल परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.