जालना - सध्या राज्यात कोरोना ने हाहाकार माजविला आहे. त्याला जालना जिल्हा आणि शहर देखील अपवाद नाही. त्यामुळे जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा लागू आहे. हा कायदा पायदळी तुडवत आणि सदर बाजार पोलिसांच्या साक्षीने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी आंदोलन केले. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्याची तसदी सदर बाजार पोलिसांनी घेतली नाही.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पक्षाकडून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची झालेली कथित हत्या आणि मारहाणीच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्यावतीने बुधवारी निदर्शने करण्यात आली. संभाजीनगर परिसरात असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर ही निदर्शने झाली. यावेळी सदर बाजार पोलिस ठाण्याचे कर्मचारी देखील तिथे उपस्थित होते, मात्र या आंदोलनात न सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळले गेले, ना कोणती पूर्वपरवानगी घेतली गेली. हा सर्व प्रकार पोलिसांच्या समक्ष सुरू होता. मात्र त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली.
एकीकडे राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन सामाजिक अंतर पाळण्याकरीता टाहो फोडत आहे, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रात्रंदिवस गस्त घालत आहेत, मात्र डोळ्यासमोर दिसणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या गर्दीला आळा घालण्याची किंवा कारवाई करण्याची तसदी सदर बाजार पोलिसांनी घेतली नाही. हे सर्व झाल्यानंतर देखील सामाजिक अंतर पाळण्याचा दावा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्यांनी केला आहे.