भोकरदन (जालना) : भोकरदन नगरपरिषदने शहरातील कापड दुकान, हॉटेल या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सुचना दिल्या होत्या. परंतु, या सुचनांचे पालन न करणे, मास्क न लावणे, अशा नागरिकांविरुद्ध प्रशासनाने आता धडक कारवाईचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मागील दोन दिवसात प्रशासनाने सुमारे 13 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
कोरोना विषाणू संक्रमण काळात मास्क न लावता घराबाहेर फिरणे, फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणे, अशा विविध चुका करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन नगरपरिषदच्या वतीने यापूर्वीच करण्यात आले होते.
हेही वाचा... "चटणी-भाकर खात होतो.. ती पण देवाने हिरावून घेतली" आशा सेविकेची व्यथा
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे यास, 1000 रुपये दंड आणि फौजदारी गुन्हा, मास्क न लावणे 500 रुपये दंड, फिजिकल डिस्टन्स न बाळगणे 200 रुपये दंड, व्यवसाय करणाऱ्यांनी त्यांचे दर पत्रक न लावणे यासाठी 5,000 रुपये दंड, विनाकारण घराबाहेर फिरणे 100 रुपये दंड याप्रमाणे परिषदेकडून दंड आकारण्यात येई, अशा सूचना मागील काही दिवसांपासून शहरात रिक्षांवर बसवलेल्या परिप्रेक्षकाद्वारे पालिका प्रशासन देत होते. मात्र, याचे पालन होत नसल्याचे लक्षात आले.
यानंतर दिनांक 11 जून ते 12 जून या दोन दिवशी केलेल्या कारवाईत, पहिल्या दिवशी 4 हजार 600 रुपये तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 9 हजार रुपये दंड म्हणून प्रशासनाने वसूल केला आहे. अशी माहिती नगरपरिषदच्या वतीने देण्यात आली. सदरील कारवाई नगरपरिषदचे मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यात कार्यलयीन अधिक्षक वामन आडे, बबन जाधव, भूषण पाळसपगार, वैभव पुणेकर, शशिकांत सरकटे, बजरंग घुलेकर,गोवर्धन सोनवणे, परसराम ढोके आदींचा समावेश आहे.