जालना - राजूर ते पैठण या निर्माणाधीण असलेल्या रसत्याचे काम सुरू आहे. सध्या बदनापूर ते सोमठाणा दरम्यान रस्त्याचे काम सुरू असून ते संथगतीने सुरू आहे. त्यामुळे, सोमठाणा येथील रेणुका मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रस्त्यावरून ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
बदनापूर तालुक्यासह जालना व औरंगाबाद जिल्ह्यातील अनेकांचे कुलदैवत असलेल्या सोमठाणा येथील रेणुका मातेची यात्रा दरवर्षी मोठ्या थाटामाटात होत असते. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा रद्द करण्यात आली असून मंदिरात भाविकांना प्रवेश नकारण्यात आला आहे. तरी बदनापूर तालुक्यातील भाविक या ठिकाणी दर्शनाला येत आहेत. मंदिर बंद असल्याने भाविक मंदिराच्या पायऱ्यांवरून दर्शन घेत आहेत. मात्र, रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने भाविकांना मंदिरात पोहोचणे कठीण झाले आहे.
राजूर ते पैठण या तीर्थक्षेत्र जोड योजनेचा रस्ता तयार होत असून, बदनापूर ते पाचोड हा रस्ता जवळपास पूर्ण झालेला आहे. मात्र, दाभाडी ते बदनापूर या रस्त्याचे काम ठेकेदाराच्या वेळकाढू भूमिकेमुळे रेंगाळत पडल्याचे दिसून येत आहे. आता ऐन नवरात्रीत सोमठाणा ते बदनापूर या रस्त्याचे काम सुरू असून यंत्राद्वारे रोड खोदून त्या ठिकाणी खडी अंथरूण टाकलेली आहे. त्यामुळे, पायी जाणाऱ्या भाविकांना व वाहनांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. मंदिर उघडण्यासाठी आंदोलन करणाऱ्या जिल्ह्यातील एका प्रमुख नेत्याच्या नातेवाईकांकडे या कामाचा ठेका असताना ऐन नवरात्रीत या रस्त्याचे काम सुरू असल्याने भाविकांना नाहक त्रास होत आहे.
ही वाचा- नवरात्रोत्सवात मंठा येथील रेणुकामाता मंदिरात शुकशुकाट