जालना (बदनापूर) - कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी जालना जिल्ह्यात आपत्ती निवारण कायद्यातंर्गत जमावबंदी व संचारबंदीचे आदेश आहेत. या अंतर्गत जीवनावश्यक वस्तू सोडून कोणतीही वाहतूक करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातलेली असतानाही बदनापूर तालुक्यात अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्यांचा हैदोस सुरूच असल्याचे दिसून येत आहे. दोनच दिवसांपूर्वी अवैध्य वाळू वाहतूक प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक पूजा पाटील यांनी एक हायवा जप्त करून गुन्हा दाखल केला होता. आता पुन्हा तालुक्यातील मांजरगाव येथील नदीपात्रात काचा फुटलेला व बॅटरी नसलेला ६ ब्रास वाळूने भरलेला हायवा बेवारस आढळून आला आहे.
राज्यात कोरोना विषाणूचे सावट असतानाही अवैध वाळू वाहतूक सुरूच असल्याचे दिसून येत आहे. पोलिस निरीक्षक मारुती खेडकर यांनी कुंभारी शिवारातून एक अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त करून पोलिस ठाण्यात लावला आहे.
सोमवारी रात्री जमावबंदीनिमित्त पोलिस निरीक्षक मारुती खेडकर हे आपल्या सहकाऱ्याबरोबर कर्तव्य बजावत असताना कुंभारी शिवारात हायवा क्रमांक एमएच ४६ बीएफ ६४०८ मध्ये ६ ब्रास वाळू वाहतूक करताना आढळून आले. याप्रकरणी गणेश बाबूराव शिनगारे, रा. डोंगरगाव, अप्पासाहेब उगले यांच्यासह हायवा ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान दुसऱ्या एका घटनेत तालुक्यातील मांजरगाव येथील तलाठी भागवत वाघ यांनी तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरगाव येथील नदीच्या पात्रात ६ ब्रास वाळूने भरलेला हायवा क्रमांक २१ बीएच ४२८९ हा काचा फुटलेल्या अवस्थेत आढळून आला. या हायवाला बॅटरी नव्हती. तसेच, मागील दोन्ही चाकांची हवा सोडलेल्या अवस्थेत बेवारस स्थितीत आढळून आल्याने हायवा मालक अर्जुन पालदेरा, टाकळी हिवर्डी ता. भेाकरदन याच्या विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीसांच्या या कार्यवाहीमुळे अवैध वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.