बदनापूर (जालना) : 'स्वच्छ भारत अभियान' आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बदनापूर नगरपंचायतीने शहरात नियमित स्वछता उपक्रम राबवत यावा, यासाठी चार घंटागाड्यांची खरेदी केली आहे. सध्या नियमितपणे शहरात स्वच्छता केली जात आहे. शहरातील कचरा घरोघरी जाऊन गोळा करण्याचे काम नगरपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी करत आहे. त्यामुळेच हा उचललेला कचरा वाहतुकीसाठी नगरपंचायतीने आता चार नवीन घंटागाड्या खरेदी केल्या आहेत.
आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते या चारही घंटागाड्यांना हिरवा झेंडा दाखवून त्यांचे लोकार्पण करण्यात आले. या घंटा गाड्या नियमित शहरात घरोघरी पोहचणार असल्याने शहरातील केर-कचरा शहराबाहेर जाऊन नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहील, असे आमदार महोदयांनी यावेळी म्हटले आहे.
हेही वाचा... लाॅकडाऊन: रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये 'या' सुविधा सुरू...
बदनापूर नगरपंचायतीला स्वच्छता निधी उपलब्ध झाला होता. त्यानुसार बदनापूर नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता गणेश ठुबे, स्वच्छता निरीक्षक अशोक बोकन हे कर्मचाऱ्यांमार्फत शहरात नियमित स्वच्छता करून घेत आहे. नागरिकांनी देखील घरातील कचरा घराबाहेर न टाकता साठवून ठेवावा, नगरपंचायतीच्या घंटागाड्या घरोघरी येऊन कचरा घेऊन जातील, असे आव्हान करण्यात आले आहे.