जालना - बदनापूर नगर पंचायतीला शासनाने घनकचरा व्यवस्थापनसाठी १ कोटी २१ लाख ३५ हजार रुपयांचा निधी दिला. यासंदर्भात नगर पंचायतीकडून निविदा काढून एका खासगी संस्थेला स्वच्छेतेचे काम देण्यात आले आहे. या संस्थेने केवळ देखावा म्हणून तीन दिवस घंटा गाड्या शहरात फिरवल्या मात्र तब्बल चार दिवसापासून त्या गाड्याही बंद झाल्याने स्वच्छेतेचे तीन तेरा झाले आहेत. शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्याने रोगराईला आमंत्रण मिळत आहे, मात्र नगर पंचायत बघ्याची भूमिका घेतल्याची चर्चा परिसरात आहे.
हेही वाचा... सांगलीत ऊस दर आंदोलनाची ठिणगी, एफआरपीच्या मागणीवरुन स्वाभिमानी आक्रमक
बदनापूर शहरात स्वच्छता केली जात नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. ओला व कोरडा कचरा रस्त्यावर फेकला जात आहे. गेल्यावर्षी शासनाने स्वच्छता अभियान अंतर्गत बदनापूर नगर पंचायतीला भरघोस निधी दिला होता. नगर पंचायतीने कागदोपत्री निधीचा वापर करून समिती येण्यापूर्वी नाममात्र स्वच्छता केल्याचे दिसून येत आहे. मागील चार दिवसांपासून शहरात घंटा गाडी फिरत नसल्यामुळे ठिकठिकाणी कचरा साचल्याचे दिसत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेऊन नागरिकांच्या आरोग्याशी खेळताना दिसत आहे. सद्य स्थितीत शहरात ताप आणि उतर रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.
हेही वाचा... 'मुंबई नशेच्या विळख्यात'; 19 महिन्यांत 1081 कोटींचे अंमली पदार्थ जप्त
बदनापूर नगर पंचायतला शासनाकडून करोडो रुपयांचा निधी, कचरा उचलणे व त्यावर प्रक्रिया करण्यासाठी मिळालेला आहे. त्या अनुषंगाने नगर पंचायतने अटींच्या अधीन राहून यासाठी एका खाजगी संस्थेला त्याचे काम जोडून दिले. त्यानुसार मागील एक ते दोन महिन्यांपासून संस्था गावातील कचरा घंटा गाडयाच्या माध्यमातून संकलित करत होती, परंतु नगर पंचायत प्रशासन व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे साटेलाटे असल्यामुळे या घंटा गाडया कधी येतात तर कधी येत नाही, असे नागरिकांनी म्हटले आहे.
हेही वाचा... निलंग्यात एका महिलेने दिला तिळ्यांना जन्म, पालकांसमोर पालनपोषणाचा बिकट प्रश्न
घनकचरा व्यवस्थापनासाठी नगर पंचायतकडून जवळपास 1 कोटी 21 रुपयांचा निधी वापरण्यात येणार आहे. या निधीतून बदनापूर शहरातील कचरा एकत्रित करून ओला कचरा व कोरडा कचरा एका ठिकाणी जमा करावयाचा आहे. त्यानंतर त्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत निर्मिती करण्याचेही या निविदेत असल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि, संकलित कचरा एकत्रित करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी नगर पंचायत कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले जाते. दरम्यान नगर पंचायतीने तहसील कार्यालय परिसरातील गायरान जागेवर हा कचरा टाकण्याचे या संस्थेला सांगितले. परंतु या गायरान जागे शेजारीच नियोजित पोलीस वसाहत असून त्या वसाहतीची अर्धवट बांधकाम केलेली इमारत आहे. नगर पंचायतच्या दुर्लक्षामुळे घंटा गाडीतील कचरा येथे येऊन पडत असला, तरी नियोजनाअभावी यावर कोणतीही प्रक्रिया होत नसल्याने प्रचंड दुर्गंधी येथे येत आहे. त्यातच पोलीस वसाहतीच्या आजूबाजूलाच हा कचरा पडल्यामुळे पोलीस प्रशासनाच्या वतीने या घंटा गाड्या येथे न टाकण्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळ् मागील चार दिवसांपासून बदनापूर शहरातील कचरा तसाच पडून आहे, त्यामुळे गल्लोगल्ली कचरा कोंडी झालेली असून नगर पंचायतच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.