जालना - सेना-भाजप युतीच्या सरकारने राज्यामध्ये कोट्यवधींची कामे केली आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून परतूर येथे वॉटर ग्रीडचे काम प्रगती पथावर आहे. या कामासोबतच रस्ते वीज या अडचणी सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले गेले. या कामाच्या जोरावर आपण याहीवेळी निवडून येऊ. गेल्या पाच वर्षात जिल्ह्यांमध्ये 20 हजार कोटींची विकासकामे केली. ती पुढील पाच वर्षांमध्ये दुप्पट करून 40 हजार कोटींची विकासकामे जालना जिल्ह्यात करू, असा विश्वास राज्याचे पाणीपुरवठा तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री आणि परतूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बबनराव लोणीकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
हेही वाचा- तपास अधिकारी बदला; कॉ. पानसरेंच्या कुटुंबीयांची न्यायालयात मागणी
जालन्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी त्यांच्यासोबत संतोष दानवे उद्योगपती किशोर अग्रवाल, घनश्याम शेठ गोयल, माजी जिल्हाध्यक्ष भांदर्गे, विलास नाईक, आदींची उपस्थिती होती. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळात केलेल्या कामाचा आढावा त्यांनी यावेळी दिला. परतूर मतदार संघा सोबतच जिल्ह्यामध्ये राबविलेल्या महत्त्वांच्या कामांमध्ये जलयुक्त शिवार, स्वच्छ भारत मिशन, मराठवाडा वॉटर ग्रीड, या योजनांविषयी देखील माहिती दिली.
जालना जिल्ह्यातील विकासकामांबद्दल माहिती देताना शेगाव-परतूर -पंढरपूर हा पालखी मार्ग 1 हजार 867 कोटी 53 लक्ष रुपये, मराठवाडा वॉटर ग्रीड 1529 कोटी, जलयुक्त शिवार 256 कोटी, जिल्हा नियोजन समिती निधी 932 कोटी, मंठा शहर विकास कामे 75 कोटी, परतूर शहर विकास कामे 145, कोटी ऊर्जा विभाग 589 कोटी, अशा विविध प्रकारच्या 20 हजार कोटींच्या कामाची यादी त्यांनी दिली. उद्या बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परतूर येथे सभेसाठी येत असल्याची माहीतीही त्यांनी दिली.