जालना - परतूर विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शिवाजी सवने यांच्यावर शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हल्ला करण्यात आला आहे. सवणे प्रचार संपवून आष्टीजवळील कनकवाडीवरून परतूरकडे परतत असताना अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक करत हल्ला केला. सवणे यांच्या ड्रायव्हरने प्रसंगावधान राखत गाडी न थांबवता, वेगाने पुढे नेली. या हल्ल्यात गाडीच्या काचा फुटल्याने सवणे यांच्या हाताला आणि तोंडाला दुखापत झाली आहे. या हल्ल्यात त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले असून सवणे यांच्या सोबत असलेले वंचितचे तालुकाध्यक्ष रोहन वाघमारे हे देखील किरकोळ जखमी झाले आहेत.
हेही वाचा - आष्टीचे भाजप उमेदवार भीमराव धोंडे यांनी केला आचारसंहितेचा भंग?
या बाबत शिवाजी सवने यांच्याशी संपर्क साधला असता आष्टी परिसरात मतदारांचा वंचितला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मतदारांच्या मनात दहशत निर्माण करण्याच्या हेतूने माझ्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामागे असणार्यांना मतदार आपल्या मतदानाच्या माध्यमातून धडा शिकवतील असे त्यांनी संगितले.
हेही वाचा - कारागृहाऐवजी रमेश कदम ठाण्यातील घरात, 1 पोलीस बडतर्फ तर 4 निलंबित
मतदानाच्या एक दिवस अगोदर हा हल्ला झाल्याने राजकीय क्षेत्रातून वेगवेगळे तर्क वितर्क लढविले जात आहेत. निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली नसल्याची माहिती सवणे यांनी दिली.