जालना - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या सर्व उद्योगधंदे बंद असल्यामुळे अनेक मजुरांचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे समाजातील गोरगरीब, निर्वासित, बेघर असलेल्यांना 'अन्नछत्र संघटन'च्या वतीने जेवण वाटप करण्यात येत आहे.
या संघटनेच्या माध्यमातून शहरातील अनेक रुग्णालयांमध्ये गरजूंना अन्न पुरवले जात आहे. तसेच रविवारी आणि मंगळवारी 2 दिवस उत्तरप्रदेशला निघालेल्या रेल्वेतील कामगारांनाही 2 वेळचे जेवण या संघटनेच्या वतीने देण्यात आले.
तयार किटमध्ये तिखट-मिठाच्या पुऱ्या, ठेचा, लोणचे असे पदार्थ मजुरांना देण्यात येत आहेत. 25 मार्चपासून दररोज दीड हजार तयार अन्नाच्या पाकिटाचे वाटप करण्यात येत आहे. नुकतेच जालन्याहून परराज्यात जाणाऱ्या बसमधील प्रवाशांना देखील या पाकिटांचे वाटप करण्यात आले.
'अन्नछत्र संघटन'मध्ये राहुल मित्तल, आकाश तालुका, नितीन अग्रवाल, दिलीप अग्रवाल, सारिका तालुका, पुनम अग्रवाल, नेहा अग्रवाल, आकाश गिंडोडिया, कृष्णा डेविड, आदी कार्यकर्ते सहभागी आहेत.