जालना - तालुक्यातील पुणेगाव येथील रहिवासी कारभारी साहेबराव अंभोरे हे गेल्या 12 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. त्यांच्या गावातीलच काही लोकांनी गावच्या गट नंबर 82 आणि गट नंबर 102 मधील सुमारे 90 एकर गायरान जमिनीवर अतिक्रमण केले आहे. ते अतिक्रमण हटविण्यासाठी अंभोरे हे उपोषणास बसले आहेत.
पुणेगाव येथील अंभोरे यांनी दिनांक 19 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून हे अतिक्रमण न काढल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला होता. या अनुषंगाने या गावचे ग्रामसेवक संभाजी कटारे यांनी दिनांक 7 ऑगस्ट रोजी या गायरान जमिनीवर अतिक्रमण करून वखरणी व पेरणी केल्याप्रकरणी 4 जणांची नावे तालुका जालना पोलीस ठाण्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंदविला होता. याप्रकरणी पोलिसांनी गंगाराम दगडू पाखरे, विश्वनाथ शामराव पाईकराव, बबन अण्णा ठाकरे, शालिनी कारभारी पाईकराव यांच्यावर गुन्हा नोंदविला होता. मात्र, पुढील कारवाई करून ट्रॅक्टर जप्त करण्यासाठी पोलीस टाळाटाळ करीत आहेत. हा आरोप करून जालन्याचे अण्णा हजारे म्हणजेच कारभारी अंभोरे यांनी 5 तारखेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
तालुका पोलिसांना या प्रकरणातील सगळी माहिती आहे. आरोपीची नावे देखील माहीत आहेत. तसेच ट्रॅक्टरबद्दलही माहीत आहे. मात्र, आर्थिक हितसंबंध गुंतल्यामुळे पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत, असा आरोप करत गेल्या 13 दिवसांपासून अंभोरे यांचे उपोषण सुरू आहे. यासंदर्भात प्रशासनाने त्यांना वारंवार समजावून सांगितले आणि संबंधितावर कारवाई करण्याचे आश्वासनही दिले. मात्र, त्यांचे समाधान झाले नाही. यातच त्यांची खालावत जाणारी प्रकृती पाहून आज शुक्रवार 16 ऑगस्ट रोजी अंभोरे यांना पाठिंबा देण्यासाठी पुणेगाव येथील सुमारे 50 महिला पुरुषांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 1 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत ठिय्या दिला होता.
दरम्यान प्रकरण चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी रॅपिड ऍक्शन फोर्स मागविली होती. मात्र, तालुका जालना पोलिसांनी संबंधितावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले, परंतु अंभोरे यांचे समाधान झाले नाही जोपर्यंत ट्रॅक्टर जप्त करत नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याची भूमिका कारभारी अंभोरे यांनी घेतली. त्यामुळे तालुका जालना पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी संबंधित गावात जाऊन ट्रॅक्टर जप्त करून आणले. मात्र अंभोरे यांचे समाधान न झाल्यामुळे गावातील गायरान जमिनीवर केलेल्या पेरणीचे काय? सदरील जागा ग्रामपंचायतच्या ताब्यात देण्यात यावी अशी मागणी करत त्यांनी पुन्हा उपोषण सोडण्यास नकार दिला आहे. त्यामुळे दुपारी सुमारे 5 तास जिल्हाधिकारी कार्यालयात तहसील, पोलीस प्रशासन आणि गावकरी यांच्यामध्ये झालेली चर्चा वायफळ ठरली आहे.
कारभारी यांचे उपोषण सोडायचे कसे ? हा यक्षप्रश्न प्रशासनासमोर उभा आहे. दरम्यान या सर्व प्रकारांमध्ये तालुका जालना पोलीस आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेले हे उपोषण आता वेगळ्या वळणावर पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिस्थिती पाहता रात्री 8 च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडलेल्या महिलांची समजूत घालून त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काढण्यात आले. मात्र, काही महिला उशिरापर्यंत उपोषणस्थळी बसल्या होत्या. जिल्हा प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार गणेश पोलास यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तर, उपोषण करत यांच्या बाजूने आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते संजय देठे, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दत्तात्रय कदम यांनीही समन्वयाची भूमिका घेतली.