जालना - अवकाळी पावसामुळे शेतीचे वेळापत्रक बदलले आहे. त्यामुळे कापूस वेचणीला येतो त्यावेळी आता कापसाला बोंडे लागली आहेत. मात्र, या प्रत्येक बोंडामध्ये गुलाबी आळीने शिरकाव केला आहे. त्यामुळे अशा कापसाला विनाकारण संभाळत न बसता बदनापूर तालुक्यातील शेतकरी कापूस काढून तिथे हरभरा आणि गव्हाचे पीक घेत आहेत. त्यामुळे शेत रिकामे न राहता इतर पिकातून उत्पन्न घेण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे.
हेही वाचा- भारताकडून पृथ्वी- २ क्षेपणास्त्राची आणखी एक 'नाईट टेस्ट'
अवकाळी पावसामुळे विहिरी पाण्याने तुडुंब भरलेल्या आहेत. त्यामुळे गव्हाचे उत्पन्न घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यासोबत कोरडवाहू शेतीमध्ये अजूनही चांगल्या प्रमाणात ओल असल्यामुळे हरभरा पेरणी देखील मोठ्या प्रमाणात केली जात आहे. यासंदर्भात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे हे ग्रामीण भागात जाऊन शेतकऱ्यांना फरदड मुक्त गाव अभियान करण्यासाठी मार्गदर्शन करीत आहे. त्यांच्यासोबत उपविभागीय कृषी अधिकारी नवनाथ कोकाटे, तालुका कृषी अधिकारी व्यंकट टक्के, मंडल कृषी अधिकारी शांतीलाल हिवाळे यांचीही उपस्थिती होती.