जालना - जिल्हा कोविड हॉस्पिटलमधील आरोग्य कर्मचाऱ्यांची पिळवणूक सहन न झाल्याने एका डॉक्टरने कोविड रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. याप्रकरणी पोलिसांनी या डॉक्टरला ठाण्यात नेऊन नोटीस बजावून सोडून दिले. हा प्रकार शुक्रवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडला.
पोलिसांनी घेतले ताब्यात -
जिल्हा सामान्य रुग्णालयात आता पूर्णपणे कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे इथे डॉक्टर, नर्सेस, वार्डबॉय या सर्व पदांच्या ही जागा भरण्यात आल्या आहेत. मागील वर्षीच्या कोरोना काळात भरती झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी 2021 मध्ये सुमारे महिनाभर कामावरून कमी केले होते. मात्र, पुन्हा रुग्णसंख्या वाढायला लागली आणि त्यांना कामावर घेतले. दरम्यान, अशीच परिस्थिती इथे काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ. परमानंद रामेश्वर निकस यांचीही आहे. 1 ऑगस्ट 2020 मध्ये त्यांनी येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कामकाज सुरू केल्यानंतर फेब्रुवारीमध्ये त्यांचे काम थांबविण्यात आले होते. मात्र, पुन्हा सेवेत घेण्यात आले. तेव्हापासून आत्तापर्यंत या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर, वार्ड बॉय, परिचारिका तसेच सफाई काम करणाऱ्या अन्य कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळालेली नाही. त्यातच अपुऱ्या मानधनामुळे बहुतांशी कर्मचारी हे येथे दोन पाळीमध्ये काम करतात किंवा इतर दुसऱ्या ठिकाणी काम करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आणि कोरोनाबाधित रुग्णांमध्ये फिरत असल्यामुळे या कर्मचाऱ्यांचे मानसिक संतुलन खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुट्टी द्यावी, दिलेल्या सुटीचे वेतन कपात करू नये, यासह आदी मागण्यांसाठी डॉक्टर परमानंद निकस यांनी सकाळी 12 वाजेच्या सुमारास कोविड रुग्णालयासमोर ठिय्या दिला. परंतु प्रवेशद्वाराच्या बाहेर आंदोलन सुरू केल्यानंतर जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी डॉ. निकस यांना ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणून त्यांना नोटीस बजावून सोडून दिले.