बदनापूर (जालना) - तालुकास्तरावर भव्य क्रीडा संकुल उभारण्यासाठी एक कोटीच्या निधीची तरतूद शासनाने केलेली असताना तब्बल 5 वर्षांपासून जागेचा शोध सुरू होता. तालुक्यातील अकोला येथील जागा उपलब्ध झालेली असतानाही मागील एक वर्षापासून प्रस्ताव उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित असल्याने क्रीडा संकुलाचा प्रश्न प्रश्न मार्गी लागत नाही. यामुळे तालुक्यातील खेळाडूंमधून रोष व्यक्त केला जात आहे.
क्रीडा धोरणानुसार प्रत्येक तालुक्यात क्रीडा संकुल आवश्यक
राज्याचे क्रीडा धोरण 2001 अंतर्गत तालुकास्तरावर तालुका क्रीडा संकुल तर जिल्हास्तरावर जिल्हा क्रीडा संकुल उभारून राष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याचे धोरण राज्य शासनाने तयार केले. सर्वच तालुक्यात क्रीडा संकुल तयार करण्यात आले. जिल्हास्तरावर सर्व सुविधायुक्त जिल्हा क्रीडा संकुल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले. तालुका क्रीडा संकुलासाठी 2009मध्ये अनुदानाची मर्यादा 25 लाखांवरून एक कोटी करण्यात आली.
तालुका होऊनही 28 वर्षानंतर विकासाचा वाणवाच
बदनापूर या शहराला तालुक्याचा दर्जा मिळून तब्बल 28 वर्षे उलटलेला असून या ठिकाणी अद्यापही आवश्यक सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे तालुका असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या ठिकाणी तालुका क्रीडा संकुल उभारण्यासाठी शासनाने 2009 मध्ये एक कोटीचा निधी मंजूर केलेला आहे. पण, अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. 2012 मध्ये बदनापूर येथील तहसील कार्यालय परिसरातील गायरान जमीन क्रीडा संकुलाची मिळावी म्हणून प्रस्ताव देण्यात आला होता व तत्कालीन तहसीलदारांनी शिफारस करून मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयास पाठविला होता. मात्र, पुढे दुर्लक्ष झाल्याने प्रस्ताव धूळखात पडलेला आहे.
बदनापूरजवळ असलेल्या अकोला येथील जागेची केली होती निवड
तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय असताना काही मंडळींनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गाठून क्रीडा संकुल अकोला या गावात उभारण्याची मागणी केली. आमदार नारायण कुचे, तहसीलदार छाया पवार व क्रीडा अधिकाऱ्यांनी भेट देऊन जागेची एक वर्षांपूर्वी पाहणी करून जागा निश्चित केली. मात्र, सहा महिने लोटले तरी क्रीडा संकुल जागेचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी कार्यालयात पडून आहे. त्यामुळे क्रीडा संकुल प्रश्न प्रलंबित पडलेला आहे.
व्यायाम करणाऱ्यांच्या संख्येत वाढ
हिवाळ्यात वाढणाऱ्या थंडीमुळे मोकळ्या हवेत फिरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. बदनापूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील मोकळे मैदान, कृषी संशोधन केंद्र, औरंगाबाद-जालना हमरस्ता, पाथ्रीकर कॅम्प्स येथील मोकळ्या मैदानात व्यायाम करणाऱ्या अबालवृध्दाची गर्दी होत आहे. नगर पंचायतने ओपन जिम व जॉगिंग ट्रॅक या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.
आठवडी बाजारामुळे अस्वच्छता
बदनापूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोकळया जागेत गावातील बहुतांश सकाळ, सायंकाळी जॉगिंग करताना दिसून येतात. तसेच विविध व्यायाम करताना मित्र-मित्रांच्या टोळया किंवा घरातील एकत्रित कुटुंब दिसून येतात मात्र याच ठिकाणी दर शुक्रवारी आठवडी बाजार भरतो. त्यानंतर येथे स्वच्छता करण्यात येत नसल्यामुळे प्रचंड दुर्गंधी सुटते त्यामुळे व्यायाम करणाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
मैदान नसल्यामुळे रस्त्यावरच व्यायाम
बदनापूर शहरात मैदान व जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम नसल्यामुळे नागरिक भर रस्त्यावर जॉगिंग करून तेथेच व्यायाम करत असल्याचे दृश्य दिसत आहे. औरंगाबाद–जालना हमरस्त्यावर काही तरुण धावण्याचा सराव करतात. त्यामुळे नगर पंचायतीने जॉगिंग ट्रॅक व ओपन जिम तयार करून देण्याची जुनी मागणी अजूनही पूर्ण झालेली नसल्यामुळे नागरिकांत नाराजी आहे.
जागेची मंजुरी मिळताच तालुका क्रीडा संकुलचे काम मार्गी लागेल
बदनापूर या तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुलाची निधी मंजूर आहे. पण, जागेअभावी प्रश्न प्रलंबित होता. अकोला या गावात गायरान जमिनीची पाहणी करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी क्रीडा संकुल उभारण्यासाठी जागेचा प्रस्ताव तहसीलदारांकडे दिलेला असून वरिष्ठ कार्यालयात कारवाई सुरू आहे. जागेची मंजुरी मिळताच तालुका क्रीडा संकुलचे काम मार्गी लागेल, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी प्रमोदनी अमृतवाड यांनी दिली.
हेही वाचा - वेळेच्या बचतीसाठी पोलीस अधिकाऱ्यांनी अशी लढवली शक्कल
हेही वाचा - अतिवृष्टीत जमीन खरवडून गेलेल्या 'त्या' शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई