जालना - मोंढ्यामध्ये व्यापार करणारे खेराजभाई भानुषाली (वय70) हे नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी येत होते. सोमवारी (दि.30डिसें)ला ७ वाजेच्या सुमारास त्यांचे अपहरण झाले. यानंतर अपहरण करणाऱ्याने पन्नास लाखांची खंडणी मागितली. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने पूर्ण करून खंडणी बहाद्दरासह अन्य आरोपींना अटक केली आहे.
भानुशाली यांचे जुन्या जालन्यातील शिवशक्ती दाल मिल येथे निवासस्थान आहे. सायंकाळी सातच्या सुमारास त्यांचे अपहरण झाल्यानंतर त्यांच्या मुलाला पन्नास लाखांची खंडणी मागण्यात आली. यानंतर मुलाने वेळीच पोलिसांशी संपर्क साधल्यामुळे तपास सुरू झाला. मध्यरात्री वनविभागाच्या जागेतून त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली.
हेही वाचा बनावट फेसबुक खात्यावरून अश्लील फोटोसह कमेंट टाकून मागितली खंडणी, महिलेस मुंबईतून अटक
कन्हैयानगर भागातील गणपती गल्लीत राहणाऱ्या राहुल सुदाम जाधव (वय 23) याने मित्रांसह वयोवृद्ध माणसाचे अपहरण केल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली. पोलिसांनी राहुल याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच भरत भागडे (वय 23), अजय उर्फ गुड्डू जांगडे (वय 23) यांचाही सहभाग असल्याचे सांगितले.
हेही वाचा नांदेडमध्ये खंडणीची मागणी करत व्यापाऱ्यावर तलवार हल्ला; दोन अटकेत
त्यांच्याकडून या गुन्ह्यात वापरण्यात आलेले मोबाईल आणि एक दुचाकी असा एकूण 51 हजारांचा माल जप्त केला. हे सराईत गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. यापूर्वीही एका प्रकरणात मोंढ्यात दुकान फोडून चोरी केलेला बारदाना, एक छोटा हत्ती वाहन स्विफ्ट डिझायर कार अडवून लुटलेली रक्कम असा सुमारे तीन लाख वीस हजारांचा अन्य मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.