जालना - अकृषक परवान्यास आवश्यक असलेले ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी पाचशे रुपयांची लाच घेताना एका टंकलेखकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहात पकडले. अनिल प्रभाकर कुलकर्णी असे लाच घेणाऱ्या टंकलेखकाचे नाव आहे.
या प्रकरणातील तक्रारदाराची भोकरदन तालुक्यातील मौजे वरुड बुद्रुक शिवारात शेती आहे. या शेतजमिनीचा अकृषक परवाना काढण्यासाठी त्यांनी भोकरदन उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालयात रीतसर अर्ज केला. त्यावेळी या कार्यालयातील टंकलेखक कनिष्ठ सहाय्यक, अनिल प्रभाकर कुलकर्णी याने त्यांच्याकडे एक हजार रुपयांची लाच मागितली. मात्र लाच देण्याची तक्रारदाराची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 26 जुलैला तक्रार नोंदविली. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कार्यालयात जाऊन पंचांसमक्ष तक्रारीची शहानिशा केली असता त्यामध्ये तथ्य आढळून आले. त्यानुसार आज दिनांक 2 ऑगस्ट रोजी भोकरदन उपविभागीय कार्यालयात तक्रारदाराकडून तडजोडीअंती ठरलेली पाचशे रुपयांची लाच घेताना टंकलेखक अनिल कुलकर्णी याला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.