जालना - भोकरदन तालुक्यातील पद्मावती धरणात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. अरुण तुकाराम पवार (वय ३२, रा, मासरुळ ता. जि. बुलढाणा) असे मृताचे नाव आहे. अरुण मासरुळ येथून जवळच असलेल्या पद्मावती धरणात शनिवारी सायंकाळी मासेमारी करण्यासाठी गेला होता. परंतु मासेमारी करताना अरुणला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.
अरुण पवार शनिवारी मासेमारी करण्यासाठी भोकरदन तालुक्यातील पद्मावती धरणावर गेला होता. परिसरात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पद्मावती धरण तुडुंब भरलेले आहे. रात्री उशिरापर्यंत तो घरी न आल्यामुळे नातेवाईक आणि ग्रामस्थ प्रकल्पाकडे गेले, तेव्हा त्याची मोटारसायकल आणि चप्पल प्रकल्पाच्या काठावर आढळली. यावरून अरुण हा धरणात बुडला, असा अंदाज ग्रामस्थांनी लावला. त्यानंतर ही माहीती बुलढाणा येथील आपत्ती व्यवस्थापन विभाग व धाड पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस तत्काळ पद्मावती प्रकल्पावर दाखल झाले.
रविवारी सकाळपासून बुलढाणा येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाने शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा शोध लागला नाही. त्यामुळे हे पथक रात्री उशीर झाल्याने परत गेले होते. सोमवारी मासरुळ येथील काही ग्रामस्थ धरणाकडे गेले असता सकाळी सात वाजेच्या सुमारास तब्बल ३८ तासानंतर अरुणचा मृतदेह त्यांना धरणातील पाण्यावर तरंगताना आढळला. पोलीसांनी पद्मावती मृतदेह पाण्याबाहेर काढून घटनेचा पंचनामा केला.