बदनापूर (जालना) - तालुक्यातील सागरवाडी येथील अवघ्या 25 वर्षीय तरुण शेतकऱ्याने अतिवृष्टीने पिकांचे झालेले नुकसान आणि कोरोनाच्या काळात ओढावलेल्या आर्थिक संकटाला कंटाळून सोमवारी (दि. 16 नोव्हेंबर) मध्यरात्री स्वतःच्या शेतात विष घेतले होते. उपचार सुरू असताना त्याचा गुरुवारी (दि. 19 नोव्हेंबर) मृत्यू झाला आहे. या परिस्थितीत बँकेचे सहा लाख रुपयांचे कर्ज कसे फेडावे, अशी विवंचना त्यास सतावत होती.
सागरवाडी येथील गोपाल डोंगरसिंग जारवाल यांची सागरवाडी शिवारातील गट क्र. २९५/२९७ मध्ये एकूण २ हेक्टर ३५ आर जमीन आहे. त्यात मोठ्या अपेक्षेने खरीप पिकांची लागवड केली होती. मात्र यंदा कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि त्यातच अतिवृष्टीने होत्याचे नव्हते केले. त्यामुळे शेतकऱ्याच्या स्वप्नावर पाणी फिरले. अशा परिस्थितीत औरंगाबाद जिल्ह्यातील लाडसावंगी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून घेतलेले सहा लाख रुपयांचे पिककर्ज कसे फेडावे, अशी चिंता त्यास सतावत होती. त्यामुळे सोमवारी गोपाळ जारवाल यांनी रात्री उशीरा विष घेतले होते.
ही बाब घरच्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यास तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र गुरुवारी १९ नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोपाळ जारवाल याच्या आई-वडिलांचा दहा वर्षांपूर्वी मृत्यू झालेला आहे. त्यामुळे त्याच्यावर बहिणीचे लग्न करण्यासह कुटुंबाची जबाबदारी होती. त्यातच ही दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.