जालना - फेब्रुवारी 2019 मध्ये जालन्यात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पशुधन प्रदर्शनात गीर जातीच्या 'कपिला' गाईने एक लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळविले होते. तिच्या या मिळालेल्या बक्षिसाच्यापासून या गाईचे मालक घनसावंगी तालुक्यातील गणेश रामभाऊ आर्दड यांनी या गीर गाईंचा प्रचार आणि प्रसार करण्याचे ठरविले. त्यानंतर शेतकऱ्यांना जोडधंद्यासाठी या गाईंचा वापर करण्यास प्रेरित करुन उत्पादन वाढविण्याचा ध्यास घेतला आहे.
घनसावंगी तालुक्यातील राजा टाकळी येथील गणेश रामभाऊ आर्दड आणि दत्तात्रय रामभाऊ आर्दड हे दोन्ही बंधू पन्नास एकरात शेती करतात. यापैकी सुमारे पंचवीस एकर बागायती आहे त्याच सोबत 40 गीर गाई देखील यांच्यासोबत आहेत. यापैकीच एक असलेली कपिला या गाईने 2019 च्या राज्यस्तरीय पशुप्रदर्शनात उत्कृष्ट गाईचे पहिले बक्षीस मिळवून या शेतकऱ्याला एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले. यापासून प्रेरणा घेऊन गणेश आर्दड यांनी या गाईंचा प्रचार आणि प्रसार करण्याचे ठरविले. एकावेळेस दहा ते बारा लिटर दूध देणारी गाय शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. तसेच या गाईचे आयुष्य 20 वर्षांपर्यंत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जोडधंद्यासाठी परवडणारी ही गाईंची ही जात आहे. तसेच या गाईच्या दुधात, तुपात, औषधी गुणधर्म आहेत, त्यामुळे या पदार्थाना मोठी मागणी असून भाव देखील चांगला मिळतो. म्हणून या गाईंचा प्रचार आणि प्रसार करणे एवढ्यावरच न थांबता सध्या या गाईंचा वान वाढविण्याचे देखील प्रयत्न सुरू आहेत. चाळीस गाईंचे पंधरा ते वीस वासरे देखील इथे आहेत. याही पुढचे पाऊल म्हणजे या गाईंच्या संख्या वाढविण्यासाठी 'शंकर' नावाचा वळू (कठाळ्या) देखील त्यांनी तयार केला आहे. या वळूपासून गायींवर रेतन करून उत्पादनही ते वाढवणार आहेत. विशेष म्हणजे या गाईंची निगराणी, त्यांचा आहार त्यांची वेळोवेळी तपासणी करण्यासाठी घनसावंगी येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. बी. बी राजूरकर हे या ठिकाणी नियमित भेटी देऊन जनावरांची तपासणी करतात. या गीर गायीच्या मलमूत्रापासून सेंद्रिय शेतीचा ही प्रयोग केला आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ होऊन धान्य उत्कृष्ट प्रतीचे येत असल्याचे आर्दड यांनी सांगितले.
या गाईंची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी साल गड्यांची कायमस्वरूपी नियुक्ती येथे करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी राहण्याची चांगल्या घरांची व्यवस्था करण्यात आली असून मुलांचे शिक्षण शेतापासून जवळच असलेल्या राजा टाकळी येथील शाळेत घेण्याची ही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे गीर गायीच्या या उत्पादन वाढीचा प्रयत्न करणाऱ्या आर्दड बंधूंचे परिसरामध्ये चांगलेच कौतुक होत आहे.