जालना - बदनापूर तालुक्यातील देव पिंपळगावच्या एका शेतकऱ्याने जोडधंदा म्हणून शेततळ्यात सोडलेल्या मत्स्यबीजातून तब्बल 2 लाख रुपयांचे अतिरिक्त उत्पादन घेतले. तर, त्यांच्या या उपक्रमाची कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी करत जोडधंद्याकडे वळल्याल्याबद्दल समाधानही व्यक्त केले आहे.
शासनाच्या शेती विषयक योजनांचा आणि अनुदानाचा फायदा घेतला तर कुठल्याही पीक विम्याची किंवा नुकसानभरपाई मागण्याची गरज पडत नाही. तसेच नियोजन करून हवे तेवढे उत्पन्न घेता येते. याचेच एक उदाहरण म्हणून बदनापूर तालुक्यातील देव पिंपळगाव येथील शेतकरी हरिश्चंद्र नन्नावरे यांच्याकडे पाहता येईल. नन्नावरे यांनी शासनाच्या सामूहिक शेततळे योजनेतून 2014 मध्ये 34 फूट लांब आणि 34 फूट रुंद असलेले शेततळे घेतले आणि कुंभेफळ येथील तलावातून जलवाहिनी टाकून यामध्ये पाणी भरले. या पाण्यावर त्यांनी डाळिंब, मोसंबी, केशर आंबा या पिकांसोबतच अंतर्गत अन्य पिकेही घेतली आहेत. हे सर्व करत असताना अतिरिक्त उत्पन्न घेण्याची कल्पना त्यांच्या डोक्यात आली. त्यानंतर त्यांनी नगदी उत्पन्न घेण्यासाठी सप्टेंबर 2018 मध्ये या शेततळ्यात मत्स्यबीज सोडले.
हेही वाचा - शेतकरी सन्मान योजनेपासून बदनापूर तालुक्यातील शेतकरी वंचित
एका डब्यात 250 ते 300 मत्स्यबीज असतात. असे कटाळा, सुपरनेट, जातीचे सुमारे 15 डबे त्यांनी या तळ्यामध्ये सोडले आणि पाहता पाहता या माशांचे आज प्रत्येकी दिड ते दोन किलो वजन झाले आहे. तर, या माशांना जागेवरच 90 रुपये किलोप्रमाणे आज मागणी आहे. या माशांच्या खाद्यासाठी असलेल्या खास शेंगदाणा पेंड, तांदळाची चुरी, यावर नन्नावरे यांना वर्षभरामध्ये फक्त 10 हजार रुपये खर्च आला आहे. येणाऱ्या उत्पन्नातून हा खर्च वजा केला तर 2 लाख रुपये नगदी उत्पन्न हे नन्नावरे यांना होणार आहे.
हेही वाचा - शासनाने कापूस खरेदी सुरू करावी; शेतकऱ्यांची मागणी
शेतकऱ्याने फळबागेशिवाय एक जोडधंदा म्हणून सुरू केलेल्या प्रकल्पाची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.आर. शिंदे यांनी नुकतीच पाहणी केली. शेतकरी अशा जोडधंद्याकडे वळल्याल्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले. या उत्पादनासोबतच पुढील वर्षीपासून त्यांना मोसंबीचे पीक देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्याच सोबत केशर आंब्याचे हे दुसरे वर्ष असून पुढील 2 वर्षांमध्ये आंब्याचेदेखील उत्पादन नन्नावरे यांना होणार आहे.
हेही वाचा - परतूरच्या व्यापार्याने दिली जालन्याच्या व्यापाऱ्याची सुपारी; नेम चुकल्याने अनर्थ टळला