जालना - जुना जालना कांचन नगर भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला याच परिसरातील तेवीस वर्षीय तरुणाने दिनांक 4 ऑगस्ट रोजी पळवून नेले होते. मुलीनेदेखील पळून जाताना घरातील 50 हजार रुपये रोख आणि सुमारे दोन तोळे सोन्याचे दागिने लंपास केले होते. या सैराट जोडप्याला कदीम जालना पोलिसांनी आज फिल्मी स्टाईलने घनसावंगी तालुक्यातून ताब्यात घेतले. सोबतच त्यांच्याकडून पळवून नेलेली रोख रक्कम आणि दागिनेदेखील हस्तगत केले आहेत.
कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीचा शोध घेत असताना त्यांचा मोबाईल बंद असल्यामुळे तपास लावणे कठीण जात होते. मात्र, पोलीस यंत्रणा गप्प न बसता मुलाच्या नातेवाईकांशी संपर्क ठेवत होती. या माध्यमातून हे जोडपे औरंगाबाद येथील त्यांच्या नातेवाईकांकडे असल्याचे लक्षात आले. पोलीस त्या घरी जाईपर्यंत या जोडप्याने तेथून पोबारा केले. मात्र, पोलिसांनी या नातेवाईकांकडे सखोल चौकशी केली असता ते घनसांगवीकडे गेले असल्याचे कळले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून घनसावंगी येथून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथूनही ही जोडी पळून जाण्याच्या तयारीत होती.
दरम्यान, पोलिसांनी पाठलाग करून या दोघांना ताब्यात घेतले आहे. सोबतच मुलीने पळून जाताना घरातून चोरून नेलेले सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम देखील पोलिसांनी हस्तगत केले आहेत. तसेच या चार पाच दिवसात ते कोठे होते? आणि कोणाच्या आश्रयाला राहत होते? हे निष्पन्न झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. अशी माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली आहे. दरम्यान, या दोघांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. यानंतर तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्रीमती बनसोड पुढील निर्णय घेतील अशी माहिती आहे.
हेही वाचा - 'बाईसाहेब, पोलिसांविषयी जरा सबुरीने घ्या! माजी पोलीस अधिकाऱ्याने माजी मिसेस मुख्यमंत्र्यांना फटकारले'