जालना - ईसार पावती करूनही शेत जमीन खरेदी न करता शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये रजिस्ट्रार ऑफिसमधील एक दलालासह अन्य सहा जणांचा समावेश आहे.
2017 मधील आहे प्रकरण -
औरंगाबाद येथे राहणारे प्रेमचंद बद्रीलाल मुथा (वय 75), यांची जालना जिल्ह्यातील सिंधी काळेगाव शिवारात गट क्रमांक 162 मध्ये 15 एकर 37 गुंठे शेत जमीन होती. ही जमीन विक्री करण्यासाठी ते ग्राहक शोधत होते. दरम्यान 9 फेब्रुवारी 2011ला जुना जालना, कुचर ओटा तेथे राहणाऱ्या शेख मुस्ताक शेख अमीर, शेख असेफ शेख अमीर या दोन्ही भावांनी 23 लाख 51 हजार रुपये प्रती एकर प्रमाणे या संपूर्ण 14 एकर 37 गुंठे शेत जमिनीचा सौदा केला. त्यानुसार 84 लाख 78 हजार 293 रुपयांची ईसार पावतीही झाली. परंतु पुढे या दोघांनी दिलेल्या मुदतीत खरेदीखत केले नाही. त्यानंतरही मुदत देऊन त्यांनी ही खरेदी टाळली. त्यानंतर तडजोड म्हणून शेतकरी प्रेमचंद मुथा आणि या दोघांमध्ये पाच एकर जमीन खरेदी -विक्री करण्याचे ठरले. त्यानुसार ईसार पावतीच्या रकमेनुसार ही पाच एकर जमीन शेख मुस्ताक शेख अमीर याच्या सांगण्यावरून त्याचे विश्वासू नोकर, अंबादास पंडितराव सांगळे (रा. जिजामाता कॉलनी, संभाजीनगर), अंबादासची पत्नी शीला आणि सरला महेंद्र सिंग या तिघांच्या नावावर करून दिली. 22 डिसेंबर 2017ला हा खरेदी-विक्रीचा व्यवहार जालना येथील दुय्यम निबंधक कार्यालयात झाला. व्यवहार होत असताना याप्रकरणातील दुय्यम निबंधक कार्यालयातील दलाल संतोष जागीरदार याने रजिस्ट्रीमधील कागदांची हेराफेरी केली आणि आणि शेतीच्या चतुर्सिमेचे पान बदलून बनावट चतुर्सीमा असलेले पान लावले. 2017 मध्ये सरला महेंद्रसिंग हजारी यांच्या फोटोच्या ठिकाणी महेंद्रसिंग हजारी याला प्रत्यक्ष हजर करून फोटो काढून व अंगठा दिलेला आहे. अशा पद्धतीने दलाल संतोष जागीरदार याने प्रेमचंद मुथा आणि दुय्यम निबंधक यांची दिशाभूल करून फसवणूक केली आहे.
मुथा यांनाच धमक्या -
हे प्रकरण झाल्यानंतर प्रेमचंद मुथा यांनी शेख मुस्ताक शेख अमीर याला, जुन्या ईसार पावतीचा करारनामा रद्द करून ईसार पावती परत देण्याची मागणी केली. मात्र, तसे न होता उलट शेख मुस्ताक यानेच प्रेमचंद मुथा यांना धमकी देऊन तुम्ही मला पैसे दिले नाहीत तर तुमच्या वर खोटे गुन्हे दाखल करेल, अशी धमकी दिली.
अशी केली हेराफेरी -
मोठ्या जमिनीचा सौदा करायचा, त्याची इसार पावती करून ठेवायची आणि जमीन खरेदी करायची नाही. त्या जमिनीच्या झालेल्या इसार पावतीनुसार थोडा तुकडा खरेदी करायचा आणि त्यामध्ये ही कागदपत्रांची हेराफेरी करून ही जमीन वादग्रस्त करून ठेवायची. असा यामध्ये डाव होता. नंतर या जमिनीला कोणी ग्राहक मिळत नाहीत किंवा अशी वादग्रस्त जमीन कोणी खरेदी करत नाही म्हणत पडलेल्या भावाने हीच जमीन खरेदी करायची आणि पुन्हा तिची विक्री करायची असे हे प्रकरण आहे. दस्तावेजांमध्ये बनावट चतुर्सीमा, बनावट मोजणी नकाशा, लावून तो दुय्यम निबंधकाच्या लक्षात न येऊ देता प्रेमचंद मुथा यांची वरील सात जणांनी फसवणूक केली आहे. याप्रकरणी गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता कदीम जालना पोलीस ठाण्यात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.