बदनापूर: बदनापूर (Badnapur) येथे रिसोड कडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला अपघात (Pune Risode Travels accident) होऊन सात जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडली. ही ट्रॅव्हल्स पुण्याहून रिसोड कडे जात होती.
रस्त्यावर असलेला खड्डा चुकवण्याच्या नादात ट्रॅव्हल्स रस्ता दुभाजकाला धडकली आणि रोडवर पलटी झाली. यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले तर 5 ते 7 जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. बसमध्ये एकूण 30 प्रवासी होते. अपघाताची माहिती मिळतात बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. दरम्यान ट्रॅव्हल्स रोडवर आडवी झाल्याने जालना रोडवर वाहतूक विस्कळीत झाली होती. रस्त्यावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रशासनाने क्रेन बोलावून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करून दिला. त्यानंतर काही वेळाने वाहतूक सुरळीत झाली.