जालना - महाविद्यालयीन तरुणीचा हात धरल्याप्रकरणी तरुणाला ३ वर्ष सश्रम कारावास आणि ३ हजार रुपयाचा दंड जालना सत्र न्यायालयाने ठोठावला. सोमनाथ गणेश सातपुते असे आरोपीचे नाव असून, पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन तरुणावर परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
लाल बहादुर शास्त्री विद्यालयातील घटना
पीडिता नेहमीप्रमाणे १५ स्पटेंबर २०१६ ला परतूर येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात शिक्षणासाठी गेली होती. त्यावेळी सोमनाथ तिथे आला आणि त्याने पीडितेचा हात पकडत विनयभंग केला. याप्रकारानंतर पीडितने परतूर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली होती.
या आगोदरही पकडला होता हात
आरोपीने यापूर्वीदेखील पीडितेचा हात पकडत विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. एवढंच नाही भर रस्त्यात तिची छेड काढत होता. तर तिच्या घरासमोर जाऊन तिला त्रास द्यायचा. त्यामुळे घाबरलेल्या पीडितेने याबाबत महाविद्यालयीन शिक्षकांकडे लेखी तक्रार दिली होती. त्यानंतर शिक्षकांनी या पीडितेच्या आणि आरोपीच्या पालकांना बोलवून घेतले होते. मात्र, प्रकरण तिथेच मिटले नाही. त्यानंतरही तो पीडितेची छेड काढतच होता. अखेर वैतागून पीडितेने परतूर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.
आठ साक्षीदारांची तपासणी
या प्रकरणांमध्ये आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पीडित मुलगी, तिचे वडील, घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार म्हणजेच पीडितेची मैत्रीण, घटनास्थळाचे पंच, शाळेचे मुख्याध्यापक, व महाविद्यालयातील शिक्षक, तपासी अंमलदार के. के. शेख यांच्या साक्षी घेण्यात आल्या.