जालना - भारतात आतापर्यंत कोरोनाने 11 जणांचे बळी घेतले आहेत. तर 562 रूग्ण कारोनाने संक्रमित झाले आहेत. कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधित केले आणि देशभरात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केले आहे. तरीही हातावर क्वारंटाईन शिक्का असणारे संशयित शिक्का लपवून जनतेमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यांचा हातावर क्वारंटाईनचा शिक्का आहे, अशा संशयितांच्या घरासमोर होमगार्ड तैनात करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.
हेही वाचा - गरजूंना कुरियरद्वारे मिळणार रक्तपुरवठा
जालना तालुक्यातील गुंडेवाडी येथे मंगळवारी 3 कोरोना संशयित आले होते. मूळचे गुंडेवाडी येथील असलेले हे तिघेजण बाहेरून आल्यामुळे त्यांच्या हातावर क्वारंटाईन शिक्के मारण्यात आले होते. हे शिक्के पाहिल्यानंतर संबंधितांच्या घरातील लोकांनी आरडाओरड सुरू केली. त्यामुळे गावातील सर्व लोक घाबरले. याप्रकरणाची शासकीय यंत्रणेला माहिती दिल्यानंतर अधिकारी गावात आले. मात्र, त्यांना संशयित लोक सापडले नाहीत.
त्यानंतर संशयितांचे फोटो आरोग्य प्रशासनाला पाठविण्यात आले. त्यावेळी या संशयिताना समज देवून त्यांच्या परिवाराचीही समजूत काढण्यात आली. तेव्हा हे प्रकरण शांत झाले. गुंडेवाडी गावमध्ये बाहेर गावचे लोक येवू नये, म्हणून गावकऱ्यांनी सर्व रस्ते बंद केले आहेत.
हेही वाचा - जनतेला प्रेमाने जमेना; पोलिसांनी दिला अनेकांना 'प्रसाद'