जालना - गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटावावे, या मागणीसाठी तालुक्यातील पुणेगाव येथील रहिवासी कारभारी साहेबराव अंभोरे हे गेल्या 16 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. दरम्यान, अंभोरे यांची प्रकृती खालावल्यामुळे शनिवारी सकाळी त्यांना शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, तेथे त्यांनी उपचार न करू दिल्यामुळे त्यांचे हात-पाय बांधून उपचार करण्यात आले होते.
त्यानंतर आजही हे आंदोलन सुरूच आहे. त्यांच्या गावातीलच काही लोकांनी गावच्या गट नंबर 82 आणि गट नंबर 102 मधील सुमारे 90 एकर गायरान जमिनीवर अतिक्रमण केले आहे. ते अतिक्रमण हटविण्यासाठी अंभोरे हे उपोषणास बसले आहेत.
गेल्या 16 दिवसापासून हे उपोषण सुरू असल्यामुळे कारभारी यांचे उपोषण सोडायचे कसे ? हा यक्ष प्रश्न प्रशासनासमोर उभा आहे. दरम्यान, या सर्व प्रकारांमध्ये तालुका जालना पोलीस आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गेल्या 16 दिवसांपासून सुरू असलेले हे उपोषण आता वेगळ्या वळणावर पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.