जालना - देवमूर्ती शिवारात १६ जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. येथील एका शेतामध्ये जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, तेथील पाणी प्यायल्याने या जनावरांचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
देवमूर्ती शिवारामध्ये एका शेतात घरावरील पाण्याच्या टाकीचा अर्धा भाग कापून तो जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वापरलेला आहे. याठिकाणचे पाणी प्यायल्याने ६ हरीण, ९ शेळ्या आणि एका गाईचा मृत्यू झाला आहे.
सहा हरिणांचा मृत्यू -
या शिवारामध्ये रात्रभर चालल्यानंतर पहाटेच्या सुमारास या हरीणांनी पाणी पिले असावे. त्यानंतर त्यांचा सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टर चोपडे यांनी व्यक्त केला आहे. मृतांमध्ये ५ मादी आणि १ नर जातीचे हरीण होते. त्यापैकी १ हरीणी गर्भवती होती. या घटनेबद्दल जालना तालुका पोलिसांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवले. त्यानंतर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. शेतामध्ये विविध ठिकाणी हरिणाचे मृतदेह आढळले. या सर्वांना एकत्र करून वनविभागाच्या सिंदखेडराजा चौफुलीवरील जागेमध्ये शवविच्छेदन करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली.
नऊ शेळ्यांचा मृत्यू -
रामलाल जयंतराव साठे आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास शेळ्या चारण्यासाठी गेले होते. त्यांच्या शेळ्यांनीदेखील हे पाणी पिले आणि तासाभरातच त्यांचाही मृत्यू झाला. मात्र, यामधील एका बोकडाने या टाकीतील पाणी न पिल्याने त्याचा जीव वाचला आहे.
एका गाईचा मृत्यू -
याच परिसरातील राजेंद्र दत्तू जाधव यांच्या गाईनेदेखील त्याठिकाणचे पाणी पिले. यानंतर ही गाय बारा वाजण्याच्या सुमारास तडफू लागली. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गाईवर उपचार करण्याचे प्रयत्न केले. मात्र तिचा मृत्यू झाला.
पशुसंवर्धन विभागाने मृत जनावरांचे शवविच्छेदन केले आहे. प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच यासंदर्भात नेमका खुलासा होईल.