जालना - जालना विधानसभा मतदार संघातील दीडशे लाभार्थ्यांना गाई वाटपाचा कार्यक्रम आज पार पडला. शेष महाराज भागवत यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रम प्रसंगी ग्रामीण भागातील गरजवंतांना आणि विशेष म्हणजे निराधार महिलांना गायी वाटप करण्यात आल्या. लाभार्थ्यांकडून कोणतीही रक्कम न घेता त्यांच्या घरापर्यंत या गाई पोहोचविल्या जाणार आहेत. एका वेळी दहा लिटर दूध देण्याची या गाईंची क्षमता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याचा जोडधंदा म्हणून आणि उपजीविकेचे साधन म्हणून चांगला उपयोग होईल असा विश्वास खोतकर यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भास्कर दानवे, जालना नगरपालिकेचे उपाध्यक्ष राजेश राऊत, यांच्यासह उद्योगपती घनश्याम शेठ गोयल, ओमसेठ मंत्री, कैलाससेठ लोया, सतीश पंच, यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गाईंच्या देखभाली संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले.