जालना - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. मात्र, शेजारील औरंगाबाद आणि बुलढाणा हे दोन्ही जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे जालन्यातील संचारबंदी अद्याप कायम ठेवण्यात आली आहे. यामुळे पोलीस यंत्रणेवरील ताण अद्याप कायम आहे.
अशा परिस्थितीमध्ये पोलिसांना मदत करण्यासाठी शहरातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत 120 कोरोना वॉरियर्स काम करत आहेत. यामध्ये 13 महिलांचा समावेश आहे. शहरातील विविध विद्यालयाचे विद्यार्थी, पोलिसांत भरती होऊ इच्छिणारे तरुण, अशा सर्वांनी एकत्र येऊन अधीक्षकांकडे 'पोलीस मित्र' म्हणून काम करण्याची परवानगी मागितली होती. त्यानुसार पोलिसांच्या जिल्हा विशेष शाखेने अर्जांची शहानिशा करून अहवाल सादर केला.
त्यानंतर 120 पोलीसमित्रांना काम करण्यासाठी परवानगी देण्यात आली. पोलीस मित्रांना सुलभपणे काम करता यावे, यासाठी त्यांना अत्यावश्यक प्रशिक्षणही देण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या वतीने त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्याचसोबत पोलीस प्रशासनाने देखील महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.
चंदनझीरा पोलीस ठाण्याअंतर्गत निवड झालेल्या सहा महाविद्यालयीन युवतींनी हजेरी लावल्यानंतर पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कोठाळे यांनी देखील त्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी काम करण्यासाठी मनोधैर्य वाढवले. दोन दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांच्या एका संघटनेच्या 20 पोलीसमित्रांची निवड करण्यात आली होती. आता एकूण 120 पोलीसमित्र शहरात कार्यरत आहेत. यामुळे पोलिसांवरील कामाचा ताण कमी होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे.