जळगाव - माणसाची सावली त्याची साथ कधीच सोडत नाही, असे म्हटले जाते. परंतु, रविवारी दुपारी जळगावकरांच्या सावलीने त्यांची साथ सोडली होती. ऐकून धक्का बसला ना..! पण हो, ‘झिरो शॅडो डे’ अर्थात शून्य सावली दिवसामुळे हे घडले आहे. शून्य सावली दिवसाची अनुभूती जळगावकरांना रविवारी खगोलप्रेमींसोबत अनुभवता आली.
रविवारी दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी जळगावकरांची सावली गायब झाली. ही सावली कशी गायब होते, हे पाहण्यासाठी जळगावातील खगोलप्रेमी अमोघ जोशी यांनी भाऊंच्या उद्यानात प्रात्यक्षिकाची खास व्यवस्था केली होती. या भौगोलिक घटनेचा अनुभव घेता यावा म्हणून अनेक जळगावकर उपस्थित होते. भाऊंच्या उद्यानात सौर घड्याळ (सनडायल) ठेवण्यात आले होते. त्याद्वारे स्थानिक वेळेनुसार दुपारी १२ वाजता आणि भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी ‘शून्य सावली क्षण’ कसा होतो, हे प्रात्यक्षिकाव्दारे दाखविण्यात आले. हा एक वेगळा अनुभव खगोलप्रेमींसह नागरिकांनी अनुभवला.
काय आहे ‘झिरो शॅडो डे’
भूतलावरील प्रत्येक शहर हे वेगवेगळ्या अक्षांशावर वसले आहे. जळगाव शहर हे २१.०० अंश उत्तर या अक्षांशावर आहे. तसेच कर्कवृत्ताच्या जवळ आहे. दरवर्षी २१ मार्च ते २१ जून या काळात २६ मे रोजी सूर्याचे डेस्टिनेशन जळगावच्या अक्षांशाइतके असते. म्हणून दरवर्षी जळगाव शहरात २६ मे रोजी १२ वाजून २५ मिनिटांनी ‘झिरो शॅडो डे’ असतो. या दिवसाला 'शून्य सावली दिवस' असे देखील म्हणतात. २१ जून नंतर परतीच्या प्रवासात १८ जुलैला सूर्याचे डेस्टिनेशन जळगावच्या अक्षांशाइतके असते. त्यावेळी दुसऱ्यांदा जळगावात शून्य सावली दिवस असतो.