जळगाव- 'काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात देशात अव्यवस्था, अविश्वास आणि अराजकतेचे वातावरण होते. भ्रष्टाचार आणि बेईमानी तर उच्चस्थानी होती. काँग्रेस सरकारचे दररोज एक ना एक घोटाळे, भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत होती. काँग्रेसने जनतेच्या हक्कांवर दरोडे घालण्याचेच काम केले,' अशा शब्दांत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली.
हेही वाचा- मुख्यमंत्री हे मैदानातून पळ काढलेले पैलवान - विजय वडेट्टीवार
विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार हरिभाऊ जावळे, अॅड. रोहिणी खडसे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी दुपारी जळगाव जिल्ह्यातील रावेरात योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचारसभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. सभेत बोलताना योगींनी काँग्रेस सरकारच्या कार्यकाळावर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची वाटचाल, कलम ३७० हटविण्याचा निर्णय, अशा मुद्दे मांडले. या सभेला उमेदवार हरिभाऊ जावळे, रोहिणी खडसे, खासदार रक्षा खडसे, बेटी बचाओ अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. राजेंद्र फडके उपस्थित होते.
हेही वाचा- रंगनायक चित्रपटाच्या टीजरमध्ये राहुल गांधींचा अपमान, आडनावाचा केला आक्षेपार्ह उच्चार
योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, 'काँग्रेसच्या कार्यकाळात शेतकरी, युवक तसेच सर्वसामान्य जनतेला कोणत्याही प्रकारचा लाभ मिळत नव्हता. नोकरदारवर्ग, महिला, युवक-युवतींसाठी कोणत्याही प्रभावी योजना नव्हत्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात विकासाचा अजेंडा नव्हता. मात्र, नरेंद्र मोदींनी देशाच्या पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी विकासाचा अजेंडा राबविण्यास सुरुवात केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात जात, धर्म, पंथ आणि संप्रदायाच्या पलीकडे विषय नव्हता. परंतु, मोदींनी त्या पलीकडे जाऊन देशात विकासाचा अजेंडा राबवला. पंतप्रधान आवास योजना, आयुष्यमान भारत योजना, उज्ज्वला योजना, अशा अनेक महत्त्वाकांशी योजनांचा लाभ आज देशातील कोट्यवधी जनतेला मिळत आहे.'
... म्हणून राहुल गांधी आजीकडे पळून गेले-
'महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल काय येणार आहेत, हे राहुल गांधींना आधीच कळले आहे. म्हणून निवडणुकीचा प्रचार सुरू होण्यापूर्वीच ते इटलीला त्यांच्या आजीकडे पळून गेले आहेत,' असा चिमटा देखील योगींनी राहुल गांधींना यावेळी काढला. 'काँग्रेस आता नेतृत्वहीन झाली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नेता उरलेला नाही. काँग्रेसकडे देशाच्या विकासासाठी कोणतीही नीती नाही. गरिबांच्या कल्याणासाठी कोणताही कार्यक्रम नाही,' या शब्दांत त्यांनी काँग्रेसला लक्ष केले.
कलम ३७० हटवणे ऐतिहासिक निर्णय-
'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात कलम ३७० हटवणे हा ऐतिहासिक निर्णय झाला आहे. काश्मीरातून कलम ३७० हटवणे हे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर टाकलेले सर्वात महत्त्वाचे आणि प्रमुख पाऊल होते. जे स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिले होते, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रत्यक्षात उतरवले. पंडित नेहरू यांच्या विजयानंतर काश्मीरात कलम ३७० लागू करण्यात आले होते. हे कलम काश्मीरच्या विभाजनाचे कारण ठरेल,' असे सांगून बाबासाहेबांनी त्याला सर्वात आधी विरोध केला होता, असेही यावेळी योगी म्हणाले.