जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी अखेर ईडी नोटीस प्रकरणावर मौन सोडले आहे. आपल्याला ईडीने चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे, अशी प्रतिक्रिया खडसेंनी दिली आहे. ते आज दुपारी मुक्ताईनगर येथे एका कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, ईडीची नोटीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरातून मला फोन येत आहेत. त्यातून लोकांकडून सहानुभूती व्यक्त केली जात आहे. लोकांना असे वाटते की हा एक प्रकारचा माझ्यावर अन्याय आहे. माझ्या वारंवार होत असलेल्या चौकशा लोकांना आवडलेल्या दिसत नाहीत. पण काही निर्णय असतात, त्या आधीन राहून काम करायचे असते, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.
भाजपच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश-
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील अनेक भाजप कार्यकर्त्यांनी आज दुपारी मुक्ताईनगर येथे एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खडसेंनी त्यांचे स्वागत केले.
सविस्तर बोलणे मात्र टाळले-
एकनाथ खडसे यांनी आपल्याला ईडीने नोटीस पाठवल्याचे सांगितले. मात्र, ईडीने नेमक्या कोणत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे, कोणत्या तारखेला चौकशीला उपस्थित राहण्याबाबत सुचवले आहे, यावर त्यांनी सविस्तर बोलणे टाळले.
हेही वाचा - उद्धव ठाकरेंवर भाजपची नाराजी; मनातला द्वेष लपवता येईल का?
हेही वाचा -इंग्लडहून नाशिकला आलेला तरुण कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णालयात दाखल