जळगाव - जळगाव जिल्हा हा वनसंपदेने नटलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात यावल आणि जळगाव हे दोन स्वतंत्र वनपरिक्षेत्र आहेत. यावल वनपरिक्षेत्र हे सातपुडा पर्वतरांगांमुळे, तर जळगाव वनपरिक्षेत्र हे सातपुडा पर्वतरांगांचा काही भाग वन तसेच वन्यजीव वैविध्यतेने संपन्न आहे. जिल्ह्यातील या दोन्ही वनपरिक्षेत्रांमध्ये वाघांचे अस्तित्त्व वेळोवेळी सिद्ध झाले आहे. या वाघांच्या संवर्धनासाठी प्रयत्न झाले पाहिजे, अशी वन्यजीव संरक्षण समितीची कायमच आग्रही मागणी राहिली आहे. आज जागतिक पातळीवर 'व्याघ्र संवर्धन दिन' साजरा होत आहे. यानिमित्ताने वन्यजीव संरक्षण समितीचे संस्थापक सदस्य बाळकृष्ण देवरे यांनी सातपुड्यातील वाघांचे अस्तित्त्व टिकावे म्हणून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. 'ईटीव्ही भारत'च्या माध्यमातून त्या सर्वांसमोर मांडण्याचा हा प्रयत्न...
वन्यजीव संरक्षण समिती विषयी थोडेसे -
वन्यजीव संरक्षण बहुद्देशीय संस्था ही खान्देशातील अग्रगण्य पर्यावरणवादी संस्था म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखली जाते. संस्थापक बाळकृष्ण देवरे, रवींद्र सोनवणे, यांच्या नेतृत्वाखाली जून २००६ साली संस्थेची स्थापना करण्यात आली. तर संस्थेची अधिकृत नोंदणी ११ फेब्रुवारी २००८ साली झाल्यानंतर २००९ साली नोंदणीकृत संस्था म्हणून सर्वमान्य झाली. सुरुवातीस संस्थेत सामील होणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा उद्देश म्हणजे सर्प आणि वन्यजीव संरक्षण हाच होता. संस्थेच्या कार्य विस्तारानंतर संस्थेच्या कार्यकारिणीत वृक्ष आणि वनस्पती अभ्यासक, सर्प अभ्यासक, वन्यजीव अभ्यासक, पक्षी अभ्यासक, कीटक अभ्यासक, फुलपाखरू अभ्यासक , सरीसृप अभ्यासक, उभयचर अभ्यासक, संस्थेत सामील झाले आणि अशा अनेक अभ्यासकांचे व्यासपीठ म्हणून ही संस्था नावारूपास येत आहे. सद्यस्थितीत ही संस्था संवर्धन, संरक्षण आणि संशोधन या ३ विभागात कार्यरत असून जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अमरावती, अहमदनगर, या जिल्ह्यात संस्था सक्रिय आहे. या संस्थेच्या रेस्क्यू, रिसर्च, कॉन्झर्वेशन अशा समिती असून, त्यात ग्रीन सोल्जर गट, रेस्क्यू फोर्स गट, रिसर्च गट हे मुख्य तीन गट आहेत. डोलारखेडा आणि चारठाणा हे क्षेत्र 'अतिसंवेदनशील व्याघ्र संवर्धन क्षेत्र' घोषित करावे, यासाठी देखील संस्थेचे राज्य आणि केंद्रीय वन मंत्रालयापर्यंत प्रयत्न सुरू आहेत. गेल्या १० वर्षांपासून वन्यजीव संरक्षण समितीच्या वतीने 'व्याघ्र संवर्धन' या विषयावर जनजागृती अभियान सुरू आहे. यात मानव वन्यजीव संघर्ष कसे टाळावे, निसर्गात वन्यजीवांचे स्थान किती महत्वाचे आहे, वन्यजीव हल्ले झाल्यास काय उपाययोजना कराव्या, याबद्दल जनजागृती करण्यात येते. जागतिक व्याघ्र संवर्धन दिनानिमित्त वन्यजीव संरक्षण समितीच्या वतीने दरवर्षी सजवलेल्या वाहनातून, प्राण्यांच्या वेशभूषा करून सातपुडा पर्वतरांगांमध्ये जनजागृतीपर रॅली काढली जाते. शेकडो व्याघ्रदूत या रॅलीत हिरीरीने सहभागी होत असतात. यावेळी कोरोनामुळे नियमांचे पालन करत २० व्याघ्रदूत ४ विभागात प्रत्येकी ५ च्या संख्येने पाल, लंगडा आंबा, आणि सातपुड्याच्या दुर्गम भागात जाऊन जनजागृती करत आहेत.
निसर्ग साखळीतील वाघांचे महत्त्व -
वाघांचे महत्त्व हे संपूर्ण निसर्गसाखळीत अनन्यसाधारण आहे. वाघ हे निसर्गाच्या अन्नसाखळीतील टोकाचे स्थान भूषवतात. त्याचा अर्थ त्यांच्यापेक्षा नैसर्गिक क्षमतेमध्ये वरचढ शिकारी नाहीत. ते इतर प्राण्यांची शिकार करून जगतात. मुख्यत्वे करून तृणभक्षक प्राणी. गवत हे सर्वत्र उपलब्ध असल्याने तृणभक्षक प्राण्यांची संख्या भराभर वाढते. वाघांचे निसर्गात सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे, या प्राण्यांची संख्या नियंत्रणात ठेवणे. वाघ नसतील तर या प्राण्यांची संख्या अनियंत्रित प्रमाणात वाढेल व इतर निसर्गसंपदेवर या गोष्टीचा ताण पडेल. निसर्गचक्र बिघडून जाईल. वाघ जंगलात असणे हे जंगलाच्या स्वास्थाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. वाघ असलेल्या जंगलात साधे लाकूडतोड व जंगलावर अवलंबून लोक भीतीपोटी जात नाहीत व जंगल सुरक्षित राहते. वाघ नाहीसे झालेली जंगले साफ होण्यास वेळ लागत नाही, असा आजवरचा अनुभव आहे. जंगलतोडीने होणारे निसर्गचक्राचे दुष्परिणाम आज जागतिक तापमानवाढीने दिसतच आहेत. महाराष्ट्रातील खान्देश देखील यातून सुटलेला नाही. खान्देशात पूर्वीपासूनच वाघांचे अस्तित्त्व राहिले आहे. त्यातच जळगाव जिल्ह्यातील यावल अभयारण्य, अजिंठा डोंगररांगा आणि मुक्ताईनगरातील वढोदा वनक्षेत्रात १९६२ सालापासून वाघ अस्तित्वात असल्याची माहिती त्या परिसरातील स्थानिक जुन्या जाणकार व्यक्तींकडून मिळते. माजी मानद वन्यजीव रक्षक तथा ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक अभय उजागरे यांनी सद्यस्थितीत दुर्मिळ असलेले आणि वाघांचे प्रमुख भक्ष्य असलेले गवे देखील जिल्ह्यातील यावल अभ्यारण्यात ८० च्या दशकात मोठ्या प्रमाणात अस्तित्वात असल्याच्या नोंदी घेतल्या आहेत. आज देखील आपल्या भागात गवे असल्याच्या नोंदी मिळत आहेत. यावरून जिल्ह्यात सद्यस्थितीत असलेले वाघ हे भटके नसून जिल्ह्यातील वाघांचा अधिवास हा पूर्वीपासूनच असल्याचे सिद्ध होते. उलट उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात असलेल्या वाघांची संख्या वाढल्यास त्यांचा पुढे गुजरातपर्यंत विस्तार होऊ शकतो आणि नंदुरबार गुजरातच्या सीमेपर्यंत आजही वाघांच्या अस्तित्वाच्या खुणा आढळून येत आहेत. वाघांच्या वाढीसाठी त्यांना पुरेसे वनक्षेत्र असणे गरजेचे आहे, तितकेच संचारमार्गाचे महत्व आहे. योग्य संचारमार्ग तयार झाल्यास आणि वाघांच्या संवर्धनासाठी युद्धपातळीवर नियोजन झाल्यास वाघांची संख्या नक्कीच वाढणार आहे. मेळघाटमधील वाघांची वाढती संख्या लक्षात घेता त्या भागातून येणारे वाघ जळगाव जिल्ह्यात स्थिरावतील, मग त्यांना पुढे सरकण्यासाठी संचारमार्ग महत्वाची भूमिका निभावेल.
तर टिकून राहील वाघांचे अस्तित्त्व -
सातपुडा पर्वतरांगांनी वेढलेल्या जळगाव जिल्ह्याला मोठी वनसंपदा लाभलेली आहे. केवळ सातपुड्याला लागून असलेल्या यावल अभयारण्यातच नव्हे तर मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा आणि यावल अभयारण्य वनक्षेत्रात वाघ, लांडगे, पिसोरी, कॅरॅकल क्याट, रानकुत्रे, खवले मांजर, पाण मांजर, साळींदर, गवा, या सारखे वन्यजीव तर ट्री क्रिपर, वन पिंगळा, व्हीगर्स सनबर्ड, स्टोर्क बिल्ड किंग फिशर, सारखे अनेक पक्षी आणि दुर्मिळ वन्यजीवांचा अधिवास आहे. व्याघ्र संवर्धनाच्या योजनांवर कोट्यवधींचा खर्च दरवर्षी होत असताना वढोदा व यावल वनक्षेत्रातील वाघांना वाचविण्याबाबत मात्र, शासन यंत्रणा कमालीची उदासीन आहे. वाघ वाचवण्याच्या या चळवळीला लोकसहभाग व राजकीय इच्छाशक्तीची जोड मिळाली, तर जगण्यासाठी धडपड करणाऱ्या जिल्ह्यातील बागायदार वाघाचे अस्तित्त्व टिकून राहणार आहे.
२०१२ पासून आहे टायगर कॉरिडॉरची मागणी -
अनेक दुर्मिळ वन्यजीवांचा अधिवास असलेल्या जिल्ह्याच्या नैसर्गिक वैभवात भर घालणारा सातपुडा पर्वत हा नैसर्गिकरीत्या पश्चिम घाटाला जोडला गेला आहे. त्याला लागूनच जळगाव जिल्ह्यातील वढोदा मुक्ताईनगर वनक्षेत्र आहे. वढोदा (मुक्ताईनगर) वनक्षेत्रात वाघाचे अस्तित्त्व आढळून आल्यानंतर सातपुडा बचाव समितीने या वनक्षेत्राचा व्याघ्र संवर्धन प्रकल्प करावा, अशी मागणी करत, त्याचा सविस्तर आराखडा वनविभागाकडे पाठविला. २०१२ साली टायगर कॉन्झर्वेशन आणि रिसर्च सेंटरचे प्रमुख प्रसाद हिरे, पर्यावरण शाळेचे राजेंद्र नन्नवरे, न्यू कॉन्झरवरचे अभय उजागरे, विनोद पाटील, वन्यजीव संरक्षण संस्थेचे सचिन ठाकूर, बाळकृष्ण देवरे, सतीश कांबळे, अलेक्झांडर प्रेसडी या शिष्टमंडळाने तेव्हाच्या केंद्रीय वनमंत्री जयंती नटराजन यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली व प्रस्ताव दिला. त्याचबरोबर वाघांसाठी सुरक्षित मार्ग हवा म्हणून मेळघाट अभयारण्य, अंबा बरूआ अभयारण्य, वढोदा रेंज, यावल अभयारण्य ते अनेर डॅम वनक्षेत्र असा टायगर कॉरिडॉरचा प्रस्तावही सादर केला. सरकारने या प्रकल्पाची ‘मुक्ताई-भवानी व्याघ्र संवर्धन प्रकल्प’ या नावाने गॅझेटमध्ये नोंद केली. पण, टायगर कॉरिडॉरच्या प्रस्तावाचे भिजत घोंगडे राहिले. व्याघ्र संवर्धन प्रकल्पात महत्त्वाचा टप्पा नैसर्गिक कॉरिडॉर असून, तोच सुरक्षित नसेल तर वाघांचे संवर्धन होईल कसे, हा प्रश्न आहे. वाघ हा कायम संचार करणारा प्राणी आहे. वढोदा येथे वाघांचे आणि वाघिणीचे अस्तित्व असल्याचे पुरावे मिळाले आहेत.
मेळघाटातील वाघ तिकडे संख्या वाढल्यावर वर उल्लेख केलेल्या कॉरिडॉरद्वारे प्रजननासाठी वढोदा वनक्षेत्रात येणारच. अभ्यासकांच्या मते वाघ एकाच क्षेत्रात अधिक काळ राहिला आणि जवळच्या नात्यात प्रजनन झाले तर जनुकीय बदलांमुळे दुर्बल पिढी निर्माण होण्याचा धोका असतो. त्यामुळे वाघ स्थलांतर करताना दिसतात. छावा एक-दीड वर्षांचा झाला की तो आई व भावंडांपासून वेगळा होतो. स्वत:चे नवे क्षेत्र शोधतो. एका वाघाला २० ते ४० चौरस किलोमीटर क्षेत्र लागते. अशा क्षेत्रासाठी तो कित्येक मैल प्रवास करतो. हा मार्ग अर्थातच जंगलातला असावा लागतो. त्यामुळे आहे ते नैसर्गिक मार्ग सुरक्षित करणे तसेच नवीन मार्ग तयार करणे आवश्यक आहे. मेळघाट ते जळगाव जिल्ह्यातील अजिंठा ते अनेर डॅम वनक्षेत्रापर्यंतचा टायगर कॉरिडॉरचा प्रस्ताव तातडीने मंजूर करून त्यावर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. याच जोडीला आता वढोदा, मुक्ताईनगर, बोदवड व जामनेर, अजिंठा मार्गे गौताळा अभयारण्य जोडण्यासाठी आणखी एका कॉरिडॉरची मागणी जिल्ह्यातील पर्यावरण अभ्यासक आणि वन्यप्रेमींकडून होत आहे. जोपर्यंत वाघांच्या संचाराचे हे मार्ग सुरक्षित होत नाहीत, तोपर्यंत जिल्ह्यात व्याघ्र संवर्धन होणे अवघड आहे, असेही बाळकृष्ण देवरे यांनी सांगितले.