जळगाव - जिल्ह्यातील मुक्ताईनगर शहरात असलेल्या बऱ्हाणपूर रस्त्यावरील हिंदू स्मशानभूमीतून कोरोनामुळे मृत झालेल्या एका वृद्ध महिलेच्या अस्थी चोरीस गेल्या आहेत. ही धक्कादायक घटना शुक्रवारी समोर आली. ही घटना मृत महिलेच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी स्मशानभूमीत संताप व्यक्त करत आक्रोश केला.
मुक्ताईनगर शहरातील प्रशीक नगरातील रहिवासी असलेल्या एका ६५ वर्षीय कोरोनाबाधित वृद्ध महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यांच्यावर बुधवारी (दि. ९) मध्यरात्री १२.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर गुरुवारी (दि. १०) रात्री ८ वाजेपर्यंत नातेवाईकांनी प्रेत व्यवस्थित जळाले की नाही हे तपासले होते. त्यावेळी अस्थी देखील व्यवस्थित होत्या. त्यानंतर शुक्रवारी सकाळी मृत वृद्धेचा मुलगा व इतर नातेवाईक अस्थी घेण्यासाठी स्मशानभूमीत आले असता त्यांना धक्का बसला. त्या ओट्यावर अस्थी नव्हत्या. या प्रकारामुळे मृत महिलेच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश व संताप केला.
अस्थी विसर्जनाचा विधी कसा करायचा; नातेवाईकांचा आक्रोश
कोरोनामुळे आईचा मृत्यू झाल्याने आधीच दुःख झालेल्या कुटुंबीयांना या घटनेमुळे जबर धक्का बसला. आता अस्थी विसर्जनाचा विधी कसा करायचा? असा संताप व्यक्त करत मृत महिलेच्या मुलांनी व नातेवाईकांनी स्मशानभूमीत आक्रोश केला. भ्रमणध्वनीवरून याघटनेची माहिती मिळाल्यावर आमदार चंद्रकांत पाटील स्मशानभूमीत पोहोचले. मृताच्या कुटुंबीयांनी त्यांच्याकडे पालिका प्रशासनावर कारवाईची मागणी केली. कुटुंबीय व नातेवाईकांच्या भावना जाणून घेत मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड व पोलीस उपनिरीक्षक निलेश साळुंखे यांना लागलीच घटनास्थळी बोलावण्यात आले होते. या प्रकाराची सखोल चौकशी करीत अस्थी चोरणाऱ्या भुरट्या चोरांचा तत्काळ शोध घेण्याचा सूचना आमदार पाटील यांनी केल्या.
हेही वाचा - कुणी ऑक्सिजन देता का ऑक्सिजन..! मागणी वाढल्यानं पुरवठा वाढवण्यासाठी 'एफडीए'ने कसली कंबर