जळगाव - जिल्ह्यात दुष्काळाचे सावट अधिक तीव्र होत आहे. जिल्ह्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांची संख्या सद्यस्थितीत 184 एवढी आहे. या गावांना दीडशेहून अधिक टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. येत्या आठवडाभरात टँकरची संख्या 200 पार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.
ज्या गावात पाणी टंचाई आहे, त्या गावांना जिल्हा प्रशासनातर्फे टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. गेल्या आठवड्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या 167 होती. ती आता 184 वर पोहोचली आहे. अनेक गावांमध्ये ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. शेतातील विहिरींवरून बैलगाड्यांच्या मदतीने ड्रम भरून पाणी आणण्यासाठी ग्रामस्थ इतर काम सोडून भटकत आहेत. गेल्या वर्षी वार्षिक सरासरीच्या केवळ 65 टक्के पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यात आता भीषण दुष्काळ पडला आहे. चाऱ्याचीदेखील टंचाई निर्माण झाल्याने चाऱ्याचे दर साडेचार ते 5 हजार रुपये शेकड्यावर पोहोचले आहेत.
त्यामुळे दुष्काळ निवारणार्थ निवडणूक आयोगाने आचारसंहिता शिथिल केल्याने जिल्हा प्रशासनाने तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली पाहिजे, अशी नागरिकांकडून मागणी केली जात आहे.
- जिल्ह्यातील दुष्काळ उपाययोजना-
- जिल्ह्यातील 15 पैकी 12 तालुक्यांत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सद्यस्थितीत तालुकानिहाय टँकरची संख्या अशी: जामनेर- 33, चाळीसगाव- 30, अमळनेर- 30, पारोळा- 24, पाचोरा- 14, भुसावळ- 7, भडगाव- 5, बोदवड- 4, एरंडोल- 3, जळगाव- 2, मुक्ताईनगर व धरणगाव प्रत्येकी एक असे एकूण 154 टँकर सुरू आहेत.
- पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ जिल्ह्यात 94 विंधन विहिरी व पाच तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी 264 विहिरींचे अधिग्रहणदेखील करण्यात आले आहे.
- सर्व नळ पाणीपुरवठा योजनांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला नळ आहे. पाणीपुरवठा योजनांच्या विद्युत देयकांची 11.33 कोटी रुपये रक्कम महावितरण कंपनीस देण्यात आली आहे.
- जळगाव जिल्ह्यातील दुष्काळ घोषित झालेल्या 13 तालुक्यांतील 1 हजार 348 गावातील 5 लाख 31 हजार 150 शेतकऱ्यांना 377.01 कोटी रुपये एवढी मदतदेखील वाटप करण्यात आली आहे.
- जिल्ह्यातील 62 हजार 825 शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेंतर्गत नोंदणी केली होती. त्यापैकी 20 हजार 77 एवढ्या पात्र शेतकऱ्यांना 23.72 कोटी रुपये रक्कम अदा केली आहे.
- प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंर्गत जिल्ह्यातील 1.87 लाख शेतकऱ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी 38 हजार शेतकऱ्यांना 2000 रुपये प्रमाणे पहिल्या हप्त्यापोटी 7.59 कोटी रुपये इतके अर्थसहाय्य दिले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरू आहे.
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यात 1 हजार 351 कामे सुरू असून त्यावर 7 हजार 546 मजूर उपस्थित आहेत.