जळगाव - दिवाळीच्या निमित्ताने मार्केटमध्ये खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीत हातचलाखीने पाकीट चोरणाऱ्या एका चोरट्यास शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने गुरुवारी अटक केली. या चोरट्याने ९ नोव्हेंबर रोजी एका तरुणाचे पाकीट चोरले होते. धर्मा प्रकाश भावसार (वय २८, रा. कांचननगर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.
शहरातील रामनगरात राहणारे संजय गणपत राठोड (वय ३७) हे ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.४५ वाजता चित्रा चौकातील एका इलेक्ट्रीक दुकानात मित्र दीपक शर्मा यांच्यासोबत आले होते. खरेदी करत असताना त्यांचे पाकीट चोरीला गेले होते. या पाकिटात तीन हजार रुपये रोख व महत्त्वाची कागदपत्रे होती. चोरट्याने गर्दीचा फायदा घेत राठोड यांचे पाकीट चोरले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. किशोर निकुंभ, ओमप्रकाश पंचलिंग, रतन गिते यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासून, हाती लागलेल्या माहितीच्या आधारे आरोपी धर्मा भावसार याला अटक केली. त्याने चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून अन्य काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.