जळगाव - रावेर तालुक्यात असलेल्या पाडला खुर्द गावातून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने नदीतील 4 ते 5 फूट पाण्यातून वाट काढत अंत्ययात्रा नेल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. गुरुवारी (8 ऑगस्ट) गावातील कडू मंगू महाजन यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. गावातून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने कडू महाजन यांची अंत्ययात्रा शुक्रवारी (9 ऑगस्ट) सकाळी 10 वाजता ग्रामस्थांना गावाशेजारी असलेल्या नागोई नदीच्या पाण्यातून न्यावी लागली.
पाडला खुर्द हे गाव महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशाच्या सीमेदरम्यान वसलेले आहे. सुमारे 1 हजार लोकसंख्या असलेल्या या गावाला आजही मूलभूत सुविधा उपलब्ध नाहित. गावाला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पक्क्या रस्त्यांची मागणी करूनही लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला तयार नाहीत. लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेविरुद्ध स्थानिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अंत्ययात्रा नदीच्या पाण्यातून नेताना काही अनुचित घटना घडली असती तर त्याला कोण जबाबदार राहिले असते, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
पाडला खुर्द गावाची स्मशानभूमी नागोई नदीच्या काठावर दुसऱ्या बाजूला आहे. स्मशानभूमीत जाण्यासाठी पर्यायी पक्का रस्ता किंवा पूल नाही. त्यामुळे नागोई नदीच्या पात्रातून वाट काढावी लागते. उन्हाळा किंवा हिवाळ्यात काही त्रास नसतो. परंतु, पावसाळ्यात नदीला पाणी असते. तेव्हा अडचणींना तोंड द्यावे लागते. ग्रामस्थांनी स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पक्का रस्ता किंवा लोखंडी पूल उभारण्याची मागणी केली आहे. परंतु, ही मागणी अद्यापही बेदखल आहे.