जळगाव - हिवाळ्यात थंडीमुळे भाजीपाल्याची आवक दुपटीने वाढली आहे. यामुळे आता बाजारात भाजीपाला स्वस्त झाला आहे. हिरव्या मटार शेंगा, कोबी, टोमॅटो, फ्लॉवर, शिमला मिरची, भेंडी, दोडके आदी सर्वच भाजीपाला ३५ ते ४० रुपये किलोच्या घरात आहे. केवळ शेवगा शेंगा, बटाटे, हिरवी मिरची आदींचे भाव अधिक आहेत.
हिवाळ्यात पालेभाज्यांसह फळभाज्यांचे उत्पन्न वाढले आहे. बाजारात आवक अधिक झाल्याने दरही घसरले आहेत. पोकळा, पालक, मेथी, आंबटचूका या पालेभाज्यांचे उत्पन्न वाढल्याने दर ५ ते ७ रुपये जूडीवर पोचले आहे. १० ते १५ रुपयांना दोन, तीन जुड्या मिळू लागल्या आहेत. गाजर, वटाणे शेंगा २० रुपये किलो, गिलके, दोडके, कोबी, शिमला मिरची ४० ते ४५ रुपये किलोने मिळत आहे. फ्लॉवरचे दर ३० ते ४० रुपये किलोवर स्थिरावले आहेत.
सध्या बाजारात केवळ हिरवी मिरची ५० ते ६५ रुपये किलो, शेगवा शेंगा ६० ते ८० रुपये किलो, कांदे ३० ते ४० रुपये किलो, बटाटे ४० ते ५० रुपये किलो या दराने मिळत आहे. भाजीच्या खरेदीत सर्वांत महत्वाचे असलेली कोथंबीरची आवक वाढल्याने कोथिंबरीची मोठी जूडी देखील पाच रुपयांना मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा आहे.
वाटाण्याला पसंती-
हिवाळ्यातच मिळणाऱ्या हिरव्या वाटाण्याला सध्या ग्राहकांची पसंती लाभत आहे. वाटाण्याचे विविध प्रकार स्वयंपाकात तयार करण्यावर गृहिणींचा भर आहे. बच्चेकंपनीलाही वाटाणा पसंत आहे.
शेतकऱ्यांना फटका, वाहतूक खर्चदेखील निघेना-
भाजीपाल्याचे दर कोसळल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळत असला तरी शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका सहन करावा लागत आहे. भाजीपाल्याचे दर इतके कोसळले की शेतकऱ्यांना तोडणी तसेच वाहतूक खर्चही मिळत नसल्याची स्थिती आहे. बाजारातील दरापेक्षा निम्म्याने शेतकऱ्यांना लिलावात भाजीपाला विक्री करावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक फटका बसत आहे.
भाज्यांचे आजचे (बुधवार) दर-
पोकळा- ५ ते ७ रुपये प्रतिकिलो
पालक- ५ ते ७ रुपये प्रतिकिलो
मेथी- ५ ते ७ रुपये प्रतिकिलो
गाजर- १५ ते २० रुपये प्रतिकिलो
वटाणे- १५ ते २० रुपये प्रतिकिलो
गिलके- ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो
शिमला मिरची- ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो
हिरवी मिरची- ५० ते ६५ रुपये प्रतिकिलो
कांदे- ३० ते ४० रुपये प्रतिकिलो
कोथंबीर- ५ ते ७ रुपये प्रतिकिलो