जळगाव - भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी पक्ष प्रवेशानंतर आज(रविवारी) सकाळी साडेनऊ वाजता जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयाला भेट दिली. परंतु, पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजीने खडसेंचे स्वागत केले. खडसेंच्या स्वागत सोहळ्याचा कार्यक्रम ठरलेला असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक बड्या नेत्यांनी खडसेंची भेट टाळली. केवळ महानगर कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी खडसेंच्या स्वागताचा सोपस्कार पार पाडला. त्यांच्याकडून स्वागत स्वीकारून खडसे अवघ्या 15 मिनिटात मुक्ताईनगरकडे रवाना झाले.
मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर खडसे शनिवारी रात्री उशिरा जळगावात त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. रविवारी सकाळपासून त्यांच्या स्वागतासाठी समर्थक तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निवासस्थानी गर्दी केली होती. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास एकनाथ खडसे हे पत्नी मंदाकिनी खडसे, कन्या अॅड. रोहिणी खडसे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात दाखल झाले. त्याठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत त्यांचे जल्लोषात स्वागत केले. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी खडसेंचे औक्षण करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा प्रदान केल्या.
देवकर नॉट रिचेबल-
या स्वागत सोहळ्याला राष्ट्रवादीच्या स्थानिक बड्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती होती. ही बाब लक्षात आल्याने खडसेंनी कार्यालयाबाहेरच स्वागत स्वीकारले. अवघ्या 15 मिनिटात तेथून काढता पाय घेत ते जळगावातून मुक्ताईनगरला रवाना झाले. त्यामुळे राष्ट्रवादीतील गटबाजीची एकच चर्चा सुरू झाली. या विषयासंदर्भात राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, गटबाजीचा काही विषय नाही. माझ्याकडे ग्रामीण कार्यकारिणीच्या कार्यक्रमाची जबाबदारी असल्याने मी त्या गडबडीत होतो. त्यामुळे राष्ट्रवादी कार्यालयातील कार्यक्रमाला येऊ शकलो नाही, असे उत्तर देत त्यांनी अधिक बोलणे टाळले.
आता माझा लढा वाईट प्रवृत्तींशी- एकनाथ खडसे
राष्ट्रवादीकडून स्वागत स्वीकारल्यानंतर खडसेंनी काही काळ माध्यमांशी संवाद साधला. यावेळी म्हणाले की, आज दसऱ्याचा शुभ दिवस आहे. वाईट प्रवृत्तीवर चांगुलपणाने मात केल्याचे प्रतीक म्हणून हा दिवस साजरा होतो. अनिष्ट व्यक्ती, समाजावर वाईट आघात करणाऱ्यांचे निर्दालन करण्याचा हा दिवस आहे. यापुढे आपल्याला देखील समाजातील वाईट प्रवृत्तीच्या विरोधात लढा द्यायचा आहे. समाजात जे काही वाईट घडते आहे, जे काही नियमबाह्य किंवा कायद्याबाहेर कृत्य होत आहे. त्याच्या विरोधात आपल्याला संघर्ष करायचा आहे. आता माझा लढा वाईट प्रवृत्तींशी असणार आहे, अशी प्रतिक्रिया देत खडसेंनी यापुढच्या काळात आपण आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत दिले. आज पहिला दिवस असल्याने आपण फार काही बोलत नाही. यापुढे आपल्याला राष्ट्रवादीचे संघटन मजबूत करायचे आहे. त्यासाठी सर्वांनी साथ दिली तर उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्या क्रमांकावर असेल, असा विश्वासही खडसेंनी यावेळी व्यक्त केला. सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्यानंतर ते मुक्ताईनगरकडे रवाना झाले.